पालघर, 13 मार्च : पालघर जिल्ह्यातील विरार येथील एका शिक्षिकेच्या घरात बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेला आग लागल्याची धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आहे. शिक्षिकेच्या घरात आग लागल्याने 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्याचे समजते. दरम्यान, या घटनेचा विरार पोलीस तपास करत आहेत. मात्र, उत्तर पत्रिका जळून खाक झाल्याने पालक आणि विद्यार्थी चिंताग्रस्त आहेत.
नेमकी घटना काय? –
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरात राहणाऱ्या या शिक्षिकेच्या घरी आग लागल्याची घटना घडली. या घटनेत शिक्षिकेने 12 वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या उत्तर पत्रिकांना आग लागली. या शिक्षिकेने 12 वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले असता शिक्षिकेचे घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. दरम्यान, त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर लागले आहे. दरम्यान, ही आग कशी लागली, किती उत्तरपत्रिका जळून खाक झाल्यात तसेच किती नुकसान झाले आहे, याबाबत अधिक तपास विरार पोलिस करत असून या घटनेत ज्यांचा निष्काळजीपणा असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.