देवळी (चाळीसगाव), 1 नोव्हेंबर : चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाच्या वॉर्ड क्रमांक 1 साठी येत्या 5 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. यासाठी शेतकरी विकास पॅनेल आणि प्रगती पॅनल या दोन्ही पॅनलमध्ये काट्याची लढत होणार आहे. यापार्श्वभूमीवर शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख संयोजक छगन तुळशीदास जाधव यांच्यासोबत सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या प्रतिनिधींनी संवाद साधला.
शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख संयोजक छगन जाधव प्रतिनिधींसोबत बोलताना म्हणाले की, देवळी गावातील नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण, विज. रस्ते या संदर्भातील ज्या समस्या असतील त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमचे पॅनल कटीबद्ध राहणार आहे. गावात मागील ३० ते ३५ वर्षात जाहीर व खुली अशी ग्रामसभा झाली नाही, ती फक्त कागदोपत्री झाली आहे. आमच्या पॅनलच्या उमेदवाराला संधी दिली तर ती आम्ही गावात दवंडी देऊन मंडप उभारून जाहीरपणे ग्रामसभा घेऊ, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ग्रामसभेत गावातील प्रत्येक नागरिकाला आपली मते व आपल्या समस्या मांडता येतील. अर्थातच या ग्रामसभेत बँक, शालेय व्यवस्थापन, रेशन, पाणी पुरवठा, सरकारी दवाखाना, कृषी, ग्रामसेवक किंवा ग्राम विस्तार अधिकारी, तहसीलदार, विज वितरण कंपनी. तलाठी मंडळ अधिकारी (सर्कल ) या सर्वाना निमंत्रीत करून सर्व समस्यांचे व तक्रारींचे निवारण करण्यात येईल. यावेळी त्यांनी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.