अमळनेर, 18 एप्रिल : अमळनेर येथील आर. के. नगर भागात एका भाविकाने त्याच्या घरासमोर श्री पेडकाई माता व श्री सप्तशृंगी मातेचे छोटेखानी मंदिर बांधले होते. त्याची ते नित्य सेवाही करत होते. मात्र सदरचे भाविक आता अनेक दिवस त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास असतात. येथे क्वचितच येतात. त्यामुळे सदरचे मंदिर दुर्लक्षित झाले. ही बाब मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांना कळाली.
नवमीनिमित्त विशेष पूजा व आरत्या –
दरम्यान, श्री पेडकाई माता त्यांची कुलदेवेता असल्याने डॉ. डिगंबर महाले यांनी तत्काळ सदर मंदिराचा जीर्णोद्धार केला. ख्यातनाम कलावंत गणेश सपकाळे यांनी मंदिरास रंगरंगोटी केली. मुर्त्यांना सुंदर रंग काम केले. आज रामनवमीनिमित्त डॉ. महाले यांनी ज्यांची कुलदेवता पेडकाई माता आहे अशा आर. के. नगर परिसरातील काही भाविकांना तेथे बोलाविले. सर्वांनी नवमी निमित्तची विशेष पूजा व आरत्या केल्या.
यावेळी उद्योगपती विनोद भैया पाटील, उद्योगपती बिपिन बापू पाटील, रवींद्र बोरसे, पूजा बोरसे, विकास बोरसे, जान्हवी बोरसे, प्रशांत महाले, रवींद्र बी बोरसे, अमोल बोरसे, राजेंद्र दामू महाले, पंकज बोरसे, भूषण पाटील,तेजस बोरसे वाय.एस.बोरसे, आदी उपस्थित होते. या वेळी यतीन जोशी यांनी पौराहित्य केले.
आज जमलेला भाविकांनी यापुढे या मंदिराची नित्यसेवा आळीपाळीने आपणच करावी, असे ठरविले. तसेच शहरात सर्व संमतीने सर्वांना सोयीस्कर होईल अशा मोकळ्या जागी पेडकाई मातेचे मोठे मंदिर बांधून तेथे कायमस्वरूपी सण, उत्सव व व्रतवैकल्य करावेत असे ठरले. लवकरच याबाबत बैठक होणार आहे.
हेही वाचा : ना मुंबई, ना पुणे, ना कोणता क्लास, तरी त्यानं करुन दाखवलं, पिंपळगावचा विशाल बनला PSI