मुंबई, 20 डिसेंबर : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. दरम्यान, आता या राजभवनाचे नाव बदलून लोकभवन करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमच्या किस्से राजभवनाचे या मालिकेचे नावही आम्ही किस्से लोकभवनाचे असे करत असून या मालिकेचा हा 12 वा लेख आहे.
ब्रिटिशकालीन वास्तूंचे एक वैशिष्ट्य म्हणजे या वास्तूंमधील भव्य जिने आणि वास्तूच्या बाह्य बाजूला असणारे लोखंडी स्पायरल जिने. मलबार पॉईंट येथे ‘गव्हर्मेंट हाऊस’ येण्यापूर्वी ‘गव्हर्मेंट हाऊस’ परळ येथे होते. कालांतराने त्या जागी हाफकिन इन्स्टिट्यूट आली.
परळ येथील गव्हर्मेंट हाऊसचे वैशिष्ट्य म्हणजे तेथील दिमाखदार जिना. परळ ‘गव्हर्मेंट हाऊस’ एके काळी देशातील सुंदर निवासस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. परळ येथील निवासस्थानी राहिलेले किंवा भेट देणारे अभ्यागत तेथील सुंदर अश्या भोजन कक्षाबद्दल (Banquet Hall) व नृत्य कक्षाबद्दल (Ball Room) तर भरभरून बोलतच; परंतु त्या शिवाय ते त्या प्रासादातील सुंदर झुंबरे, सजावट व भव्य जिन्याचे देखील आवर्जून कौतुक करत.
परळ येथील निवासस्थानी सौंदर्य दृष्टीने बदल करणारे गव्हर्नर माऊन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन तेथील जिन्याचा उल्लेख ‘ग्रँड स्टेअरकेस’ असा करीत, ही गोष्ट राजभवनाचे इतिहासकार सदाशिव गोरक्षकर यांनी ‘राजभवन्स इन महाराष्ट्र’ या ग्रंथात नमूद केली आहे. सन १८७७ साली मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर फिलिप वूडहाऊस आपला कार्यकाळ संपवून परळ निवासस्थान सोडून निघत असताना त्यांच्या भेटीला त्यांच्या जागी नियुक्त झालेले मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर रिचर्ड टेम्पल आले होते.
रिचर्ड टेम्पल लिहितात:
“वूडहाऊस परत जाण्याच्या अखेरच्या पूर्वसंध्येला) वनराईने नटलेल्या परळ येथील निवासस्थानी सूर्यास्ताच्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. दुसऱ्या दिवशी परळ येथून अंतिम प्रस्थान करण्यासाठी ते आपल्या सरकारी वाहनात बसण्यासाठी खाली येण्यास निघाले तेंव्हा तेथील भव्य जिना उतरताना मी देखील त्यांच्यासोबतच होतो.” दरम्यान, गव्हर्नरचे परळ निवासस्थान सोडून १४० वर्षे झाली व तेथील शाही वैभव निघून गेले असले तरीही तेथील तो जिना अनेक शतकांपूर्वीच्या आठवणी जतन करीत आजही उभा आहे.
मलबार हिल येथील जिना –
साधारण १८८५ साली ‘गव्हर्मेंट हाऊस’ मलबार हिल येथे आले. विशेष म्हणजे मलबार हिल येथील ‘गव्हर्मेंट हाऊस’ मध्ये देखील अतिशय सुंदर असा लाकडी जिना होता. परंतु तो थोडा आतल्या बाजूने होता. तळमजल्यावरील भोजन कक्षाकडून गव्हर्नर यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी असलेला हा सुंदर जिना सन १८६८ साली तयार करण्यात आला असल्याचा उल्लेख आढळतो.
उदवाहन (लिफ्ट) आल्यानंतर जिन्याचा वापर कमी झाला. पुढे गव्हर्नर आणि राज्यपाल अभावानेच जिना वापरत. परंतु सेवकवर्ग हमखास जिना वापरत. मलबार हिल येथील राज्यपालांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणामध्ये मलबार हिल येथील जिना इतिहासजमा झाला. राज्यपाल विद्यासागर राव यांनी हौशेने या जिन्यावर छायाचित्र काढून घेतले होते. त्यामुळे तो जिना आज चित्ररूपाने पाहता येतो.
स्पायरल जिना –
मलबार पॉईंट येथील ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे सेवक वर्गासाठी इमारतीच्या बाहेरून स्पायरल जिना होता. मुंबईत काही ठिकाणी हे जिने आजही टिकून आहेत. बरेचसे स्पायरल जिने आपल्या अखेरच्या घटका मोजत आहेत. राजभवनातील जुन्या इमारतीच्या छायाचित्रामध्ये हा स्पायरल जिना आजही पाहता येतो.
नागपूर लोकभवन येथील जिना –
नागपूर येथील लोकभवन सन १८९१ साली बांधण्यात आले होते. अर्थात त्यावेळी ते मध्य प्रांताच्या कमिशनरचे निवासस्थान म्हणून बांधण्यात आले होते. सुदैवाने नागपूर येथील वास्तू आज देखील दिमाखात उभी आहे. या वास्तूच्या दर्शनी भागातच सुंदर असा लाकडी जिना दृष्टीस पडतो.
लोकभवनातील जिने हे केवळ एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर नेणारे सोपान नसून, ते इतिहासाचे दुवे आहेत. अनेक महनीय व्यक्तींची पदचिन्हे त्यावर उमटलेली आहेत. सत्ता, सत्तांतरे, स्वागत आणि भावपूर्ण निरोप यांचे असंख्य क्षण या जिन्यांनी स्थितप्रज्ञतेने पाहिले आहेत.
आधुनिकतेच्या ओघात लिफ्ट व सरकत्या जिन्यांनी जुन्या लाकडी जिन्यांची जागा घेतली असली, तरी या जुन्या जिन्यांमध्ये दडलेल्या आठवणी, ते घडवणाऱ्या निनावी कारागिरांची कलाकुसर आणि सौंदर्यदृष्टी आणि काळाचा ठसा आजही जिवंत आहे. म्हणूनच, अशा जिन्यांकडे केवळ वापराच्या दृष्टीने न पाहता, वारसा म्हणून पाहणे आणि शक्य तिथे जतन करणे इतिहास जतन करण्यासारखे आहे.






