मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा नववा लेख.
गर्द हिरवळीत गिरीशिखरावर एकांतात बसलेल्या तपस्व्याप्रमाणे, सेमिनरी हिल टेकडीवर नागपूर राजभवनाचा वास्तूपुरुष गेली तब्बल 134 वर्षे जणू एका ऐतिहासिक प्रदेशाचे सातत्याने बदलते रूप न्याहाळत आहे!
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निवासस्थानांपैकी एक असलेल्या नागपूर या राज्याच्या उपराजधानीतील राजभवनाला आपला स्वतंत्र असा इतिहास आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहू गेल्यास नागपूर येथील राजभवन राज्यातील मुंबई व पुणे येथील राजभवनांच्या तुलनेत सर्वात मोठे आहे.
सन 1891 साली नागपूर येथे, आज राजभवन म्हणून ओळखली जाणारी भव्य दिव्य वास्तू बांधली गेली त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. 1891 हे वर्ष नागपूर करिता इतर काही राजकीय घडामोडींमुळे देखील महत्वाचे होते, हे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. त्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सातवे अधिवेशन नागपूर येथे भरले होते व आनंदचंद्रालू त्याचे अध्यक्ष होते.
तत्कालीन मध्य प्रांतांचे (सेंट्रल प्रॉविंसेस) कमिशनर अँटनी पॅट्रिक मॅकडोनेल हे देखील या अधिवेशनाला उपस्थित होते. हेच मॅकडोनेल ‘कमिशनर हाऊस’ मध्ये, म्हणजे सध्याच्या नागपूर राजभवनाच्या वास्तूमध्ये राहणारे पहिले निवासी होते.
तीन बाजूंनी समुद्राने वेढल्यामुळे भव्यता प्राप्त झालेल्या मुंबईच्या राजभवनाला ‘देशातील राजभवनांची सम्राज्ञी’ म्हणतात. मात्र, स्थापत्यकला व जैवविविधतेच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे नागपूरच्या राजभवनाला ‘राजभवनांचा राजा’ असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
उंच टेकडीवर वसलेले असल्याने नागपूर राजभवनाच्या या वास्तूतून, आज इतके नागरीकरण झाले असताना देखील अर्धे-अधिक शहर व सभोवतालचा परिसर दिसतो. गोंडराजे बख्त बुलंद शाह यांनी आपली राजधानी सन 1702 साली नागपूरला हलवली. सन 1804 साली रघुजीराजे भोसले यांच्या दरबारात पहिले ब्रिटिश रेसिडेंट माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांची नियुक्ती झाली.
हेच एल्फिन्स्टन सन 1819 ते 1827 या काळात ईस्ट इंडिया कंपनीचे मुंबई प्रांताचे गव्हर्नर झाले. दिनांक 2 नोव्हेंबर 1861 रोजी ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली भारत सरकारने एका ठरावद्वारे सेंट्रल प्रॉविंसेस (मध्य प्रांताची) निर्मिती केली. त्यानंतर तीस वर्षांनी राजभवनाच्या वास्तूची निर्मिती झाली व कमिशनर ए पी मॅकडोनेल त्या ठिकाणी वास्तव्यास गेले.
सन 1903 साली वर्हाड अर्थात बेरार हा भाग मध्य प्रांताला जोडण्यात आल्यानंतर प्रदेशाचे नामकरण ‘सी.पी. अँड बेरार’ असे झाले. त्यामुळे कमिशनरचे निवासस्थान असलेली नागपूर राजभवनची वास्तू सी.पी. अँड बेरारच्या कमिशनरचे निवासस्थान झाली. याच सुमारास चीफ कमिशनरच्या कार्यालयाचा उल्लेख ‘गोंडवाणा गुबर्नेटोरिस’ असा करण्यात आल्याचे दिसते.
सन 1920 पासून ही वास्तू मध्य प्रांताचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ व गव्हर्नरचे निवासस्थान झाली. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर हे निवासस्थान मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान झाले. मंगलदास पक्वासा हे जुन्या मध्यप्रदेशचे पहिले राज्यपाल झाले तर पंडित रवी शंकर शुक्ल हे पहिले ‘पंतप्रधान’ झाले.
पक्वासा यांच्यानंतर सन 1952 ते सन 1957 या काळात भोगराजू पट्टाभी सीतारामय्या हे जुन्या मध्यप्रदेशचे राज्यपाल होते. परंतु, याच काळात सन 1956 साली, भाषावार प्रांत रचनेनुसार मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे गेली व पट्टाभी सीतारामय्या भोपाळ येथे गेले.
सन 1956 साली नागपूर द्विभाषिक मुंबई राज्याला जोडल्यानंतर नागपूर येथील राजभवन मुंबई राज्याच्या राज्यपालांच्या अधिपत्याखाली गेले. सन 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर नागपूर येथील राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नागपुरातील निवासस्थान झाले.
कमिशनर हाऊस ते राजभवन : एका वास्तूचा प्रवास
1891: चीफ कमिशनर, सेंट्रल प्रॉविंस यांचे निवासस्थान
1903 : चीफ कमिशनर, सेंट्रल प्रॉविंस अँड बेरार (सी.पी. अँड बेरार) यांचे निवासस्थान
1920 : सेंट्रल प्रॉविंसेसचे गव्हर्नर यांचे गव्हर्नमेंट हाऊस
1947 : जुन्या मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे शासकीय निवासस्थान
1956 : द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपालांचे नागपूर येथील शासकीय निवासस्थान
1960 : महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांचे नागपूर येथील शासकीय निवासस्थान
1988 : महाराष्ट्राच्या उपराजधानीतील राजभवन
‘असे’ आहे नागपूर येथील राजभवन –
नागपूर येथील राजभवन सुमारे 98 एकर परिसरात वसले असून त्याची प्रवेशद्वारे वेगवेगळ्या भागात उघडतात. नागपूर येथील राजभवनात एकाच अखंड वास्तूमध्ये दरबार हॉल व बॅन्क्वेट हॉल (शाही भोज सभागृह) आहेत. राजभवनच्या इमारतीच्या प्रवेशद्वारावरच ‘Erected 1891, E Penny EX ENG’ असे कोरलेली शिला आहे.
भारतीय तसेच पाश्चात्य वास्तूशैलीचा मिलाफ असलेल्या राजभवनचे बांधकाम करण्यास किमान दोन ते तीन वर्षे लागली असतील, हे जाणवते. या वास्तू मध्ये राज्यपालांचे निवासस्थान तसेच कार्यालय तर आहेच शिवाय काही अतिथी कक्ष देखील आहेत. या वास्तूच्या पुढील भागात कमानी असून संपूर्ण इमारतीच्या दर्शनी भागात लांबच लांब वरांडा आहे.
इमारतीच्या खाली पूर्वीच्या परंपरेप्रमाणे तळघर आहे. सन 1912 साली नागपुरात वीज आली त्यापूर्वी येथील हॉल्समध्ये कापडी पंखे होते. संपूर्ण वास्तू कौलारू असून अलाहाबाद पद्धतीची कौले त्यावर बसविण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर येथील राजभवनात चक्क हत्तीखाना होता.
विस्तीर्ण वर्तुळाकार लॉन ही नागपूर राजभवनाची शान असून हिरवळीबाहेर पंचधातूपासून बनविलेली एक मोठी तोफ ठेवली आहे. या तोफेवर अरबी लिपीत कोरले असून ही तोफ हिजरी सन 1074 अर्थात इसवी सन 1663 साली औरंगजेब यांच्या काळातील आहे. या तोफेच्या काही अंतरावरच एक दुसरी लहान तोफ असून तिच्यावर 1654 असे वर्ष लिहिले आहे. लहान तोफेच्या जवळच राजभवनातील ध्वजस्तंभ आहे.
कायापालट –
साधारण तीन दशकांपूर्वी नागपूर राजभवन अतिशय दुरावस्थेला पोहोचले होते. त्याचा आत्माच जणू हरवला होता. नागपूर राजभवनाची ऐतिहासिक वास्तू जुन्या राजवाड्यांप्रमाणे खंडहर वाटू लागली होती. परिसरात अतिक्रमणे झाली होती. राजभवनाचे प्रभारी अधिकारी रमेश येवले यांनी परिसराचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका बजावली.
नागपूर राजभवनातील कर्मचारी, बागकाम कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, इतर शासकीय संस्था व अनेक श्रमिक कर्मचाऱ्यांनी देखील यात मोलाचे योगदान दिले. पडद्यामागील लोकांचे कार्य सहसा दिसून येत नाही, त्यामुळे हा उल्लेख करणे आवश्यक आहे. झपाट्याने वाढणारी आणि झाडांचा नाश करणारी परिसरात वाढलेली परकीय आक्रमक वेली काढून टाकण्यात आली.
शेकड्याने फुलझाडे तसेच पक्षी व फुलपाखरे यांना आकर्षित करणारी झाडे, औषधी वनस्पती, सुगंधी वनस्पती, निवडुंग तसेच स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात आली. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यात आला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले.
जैवविविधता उद्यान –
तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या पुढाकाराने सन 2011 साली नागपूर येथील राजभवनाच्या 70 एकर परिसरात एक भव्य जैव विविधता उद्यान तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी 30 हजार विविध प्रजातींची वनसंपदा लावण्यात आली आहे. या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये तसेच युवापिढीमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण व्हावी या दृष्टीने हे जैवविविधता उद्यान तयार करण्यात आले.
जैवविविधता उद्यानामुळे हा परिसर अधिकच सुशोभित झाला असून तेथे ‘नक्षत्र उद्यान’, ‘निवडुंग वन’, फुलपाखरू उद्यान, गुलाब उद्यान, औषधी वनस्पती उद्यान अशी विविध उद्याने विकसित करण्यात आली. एकट्या गुलाब उद्यानात देशभरातील गुलाबाच्या तब्बल दोनशेहून अधिक प्रजाती येथे आहेत.
नागपूर राजभवनात केंद्रीय भूजल मंडळाच्या माध्यमातून जल व मृद संधारणाचे मोठे काम करण्यात आले असून एकूण 43 सिमेंट बंधारे, नाला बंधारे तसेच गॅबिअन पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहे. आज नागपूर राजभवन देशातील सर्वोत्तम ऐतिहासिक परिसर म्हणून पुनश्च दिमाखात उभे आहे.
मान्यवरांचा मुक्काम –
मुंबई येथील राजभवनाप्रमाणेच नागपूर येथील राजभवनात देखील राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधान यांचा नागपूर भेटीवर असताना मुक्काम असतो. या ठिकाणी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, राष्ट्रपती आर वेंकटरमण, डॉ शंकर दयाळ शर्मा, पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती प्रतिभा पाटील, प्रणब मुखर्जी व द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांसारखे अनेक राष्ट्रीय अतिथी राहून गेले आहेत.
अधिवेशन काळात राज्यपालांचे चहापान –
दरवर्षी अधिवेशन काळात राज्यपाल परंपरेप्रमाणे राजभवन नागपूर येथे विधान मंडळाचे सदस्य तसेच गणमान्य व्यक्तींसाठी चहापानाचे आयोजन करीत असतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे.
नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तार –
गेल्या वर्षी डिसेंबर 2024 महिन्यात नागपूर राजभवनाच्या हिरवळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. कोणे एके काळी परकीय राजवटीचे सत्ताकेंद्र असलेले ‘गव्हर्मेंट हाऊस’ आज स्वतंत्र भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाही पद्धतीतील राज्यातील महत्वपूर्ण संस्था म्हणून आपले घटनात्मक कर्तव्य बजावित आहे.
नागपूर राजभवनाचा हा वास्तूपुरुष साक्षीदार राहिला आहे. असंख्य स्थित्यंतरांचा, विविध आंदोलनांचा, स्वातंत्र्य चळवळीचा, विकासाचा व अनेक घडामोडींचा. या वास्तुपुरुषाने युनिअन जॅक बदलून तिरंगा फडकताना पाहिला आहे. येथील सूर्याने परकीय सत्तेचा अस्त होताना पहिला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून नागपूर येथील राजभवन लोकशाहीची सुंदर पहाट अनुभवत आहे.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)






