मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जातो. या मालिकेतील हा सातवा लेख.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची दिनांक 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राजभवन येथे अतिशय मैत्रीपूर्ण वातावरणात भेट व द्विपक्षीय बैठक झाली. या निमित्ताने सदर लेखात राजभवन तसेच पूर्वाश्रमीच्या मुंबई प्रांताच्या ‘गव्हर्नमेंट हाऊस’ येथे वेगवेगळ्या वर्षी झालेल्या ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या, माजी पंतप्रधानांच्या तसेच ब्रिटिश राजघराण्यातील सदस्यांच्या भेटींना उजाळा दिला आहे.
मुंबईच्या दक्षिण टोकावर, मलबार पॉईंट येथे वसलेल्या राजभवनाच्या ज्या हिरवळीवर तसेच येथील ज्या दोन सभागृहांमध्ये भारत व ब्रिटनचे शीर्ष नेते भेटले त्या संपूर्ण राजभवन परिसराला ब्रिटिश वसाहतकालीन आणि स्वातंत्र्योत्तर काळाचा मोठा वारसा लाभला आहे.
ब्रिटिश कालखंडात राजभवन हे मुंबई प्रांताचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ होते. सन 1885 साली ‘गव्हर्मेंट हाऊस’ परळ येथून मलबार पॉईंट येथे स्थलांतरित झाले, त्या वेळी मुंबई प्रांताचे भौगोलिक क्षेत्र फार मोठे होते. त्यामध्ये आजच्या महाराष्ट्राचा दोन तृतीयांश भाग, गुजरात, कर्नाटकातील काही भाग, पाकिस्तानातील सिंध प्रांत तसेच येमेनमधील एडन बंदराचा समावेश होता.
सन 1885 ते 1947 या काळात या मलबार पॉईंट येथील ‘गव्हर्नमेंट हाऊस’ येथे तेरा ब्रिटिश गव्हर्नर राहून गेले.
हे गव्हर्नर होते: लॉर्ड रे (1885–1890), लॉर्ड जॉर्ज हॅरिस (1890–1895), लॉर्ड सँडहर्स्ट (1895–1900), लॉर्ड नॉर्थकोट (1900–1903), लॉर्ड लॅमिंग्टन (1903–1907), जॉर्ज सिडनहॅम क्लार्क (1907–1913), लॉर्ड विलिंग्डन (1913–1918), जॉर्ज लॉईड (1918–1923), लेस्ली विल्सन (1923–1928), मेजर जनरल फ्रेडरिक साईक्स (1928–1933), लॉर्ड ब्रॅबॉर्न (1933–1936), लॉरेन्स रॉजर लमली (1937–1943) आणि जॉन कॉलव्हिल (1943–1947)
पंतप्रधान स्टार्मर आणि पंतप्रधान मोदी यांच्या बैठकी ज्या दोन भव्य सभागृहांमध्ये झाल्या, त्या दोन्ही सभागृहांच्या निर्मितीमागे ब्रिटिश राजघराण्यातील भेटींच्या आठवणी जुळल्या आहेत.
‘जल विहार’ सभागृहात उभय पंतप्रधानांनी पत्रकारांसमोर संयुक्त निवेदन दिले. या सभागृहाच्या बांधणीला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. हे सभागृह विस्तारित रूपात सन 1875 साली ‘प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड (पुढे राजे एडवर्ड सातवे ) यांच्या मुंबई भेटीनिमित्त बांधण्यात आले होते.
पंतप्रधान स्टार्मर यांच्या सन्मानार्थ दरबार हॉल येथे सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजन आयोजित केले गेले होते. राजभवनातील हा दरबार हॉल मुळतः सन 1911 साली राजे पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आला होता.
पंचम जॉर्ज यांच्या या भेटीदरम्यानच ब्रिटिश भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे हलविण्यात आली होती. आणखी मजेची गोष्ट म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आगमनानंतर सुरुवातीला समुद्रकिनाऱ्यालगतच्या ज्या हिरवळीवर फेरफटका मारला व खुर्च्यांवर बसून काही क्षण निवांत संवाद साधला, ती हिरवळ म्हणजे ब्रिटिश काळातील तोफखाना – ‘गन प्लॅटफॉर्म’ – होते.
त्या खालीच ब्रिटिश काळातील बंकर लपले आहे. या बंकरचा पुनर्शोध सन 2016 साली लागला व जून 2022 मध्ये त्याच ठिकाणी ‘क्रांतीगाथा’ हे क्रांतिकारकांचे दालन तयार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्याचे उदघाटन केले होते.
गेल्या दीडशे वर्षात राजभवन येथे ब्रिटिश राजघराण्यातील अनेक सदस्यांच्या आणि ब्रिटिश आजी माजी पंतप्रधानांच्या गाठीभेटी झाल्या आहेत.
त्यात प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड (1875), त्यांचे सुपुत्र प्रिन्स अल्बर्ट व्हिक्टर (1889), प्रिन्स ऑफ वेल्स जॉर्ज (1905), राजे पंचम जॉर्ज (1911–12), प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड अल्बर्ट (पुढे राजे एडवर्ड आठवे) (1921), राणी एलिझाबेथ द्वितीय (1961), युवराज चार्ल्स (आता राजे चार्ल्स तृतीय) (1980) आणि अगदी अलीकडे, ड्यूक ऑफ एडिनबरो प्रिन्स एडवर्ड (2025) यांचा समावेश आहे.
ब्रिटनचे भावी ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली हे सायमन कमिशनचे सदस्य होते. कमिशनच्या अन्य सदस्यांसह ते सन 1928 साली ‘गव्हर्मेंट हाऊस’ येथे आले होते. स्वातंत्रोत्तर काळात ब्रिटनचे पंतप्रधान जेम्स कॅलाहन हे 1978 साली (राज्यपाल सादिक अली) तर पंतप्रधान मार्गरेट थॅचर या 1981 साली (राज्यपाल ओ. पी. मेहरा) येथे आल्या होत्या.
माजी ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर यांनी देखील सन 2005 साली स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या ‘सीइंग इज बिलीव्हिंग’ या नेत्रदान नेत्रसुरक्षा मोहिमेच्या निमित्ताने राजभवनाला भेट दिली होती. त्यावेळी एस एम कृष्णा. राज्यपाल होते.
आणखी एक गोष्ट: कीर स्टार्मर आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान राजभवन येथे ठिकठिकाणी भारत व ब्रिटनचे ध्वज एकत्र लावण्यात आले होते. दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी, याच ठिकाणी, मुंबई प्रांताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जॉन कॉलव्हिल यांच्या उपस्थितीत युनियन जॅक अंतिमतः उतरविण्यात आला होता व त्याजागी राष्ट्रध्वज तिरंगा फडकविण्यात आला होता.
अशा प्रकारे स्टार्मर – मोदी यांच्या भेटीचे नयनरम्य स्थळ ठरलेल्या या राजभवनाला भारत–ब्रिटन संबंधांचा आगळावेगळा इतिहास लाभला आहे. पूर्वीचे संदर्भ आता बदलले आहेत. उभय नेत्यांमधील झालेली बैठक दोन प्रगल्भ लोकशाही राष्ट्रांच्या घनिष्ट सहकार्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन, मुंबई)