मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपालांचे निवासस्थान राजभवन मुंबई येथे आहे. या राजभवनाशी संबंधित महत्त्वाचे किस्से, महत्त्वाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्या वतीने ‘राजभवनाचे किस्से’ ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून राजभवनातील माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांच्याद्वारे लिखित एक विशेष लेख दर आठवड्याला प्रकाशित केला जाईल. या मालिकेतील हा तिसरा लेख.
मलबार हिल येथील राजभवन परिसराला किमान 300 वर्षांचा इतिहास आहे. ब्रिटिश राजवटीत, सन 1885 पूर्वी, हा परिसर मुंबई प्रांताच्या (Bombay Presidency) गव्हर्नरचे उन्हाळी निवासस्थान असताना येथे मर्यादित स्टाफ राहत असे. परंतु हा टापू समुद्र किनारी वसलेला असल्याने एकोणिसाव्या शतकापासून येथे मजबूत सुरक्षा होती.
सन 1826 साली मलबार पॉईंट येथे गन प्लॅटफॉर्म, घोडपागे व गव्हर्नर कोच हाऊस होते. तसेच सचिव, मिलिटरी सचिव, टाऊन मेयर, एडीसी आदी अधिकाऱ्यांची निवासस्थाने देखील होती. सन 1885 साली ‘गव्हर्मेंट हाऊस’ मलबार हिल या ठिकाणी आले आणि गव्हर्नर सोबत त्यांचा स्टाफ अधिकारी वर्ग या ठिकाणी कायमचा आला. मग स्टाफ व अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधण्यात आली.
कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी गिरणगावाप्रमाणे चाळी बांधण्यात आल्या. कालांतराने राजभवनचा हा परिसर सर्व दृष्टीने स्वयंपूर्ण बनविण्यात आला. या परिसरात कर्मचाऱ्यांच्या लहान मुलांसाठी प्राथमिक शाळा सुरू करण्यात आली. ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी टेनिस कोर्ट तयार करण्यात आले. सर्वांच्या आरोग्यासाठी डिस्पेन्सरी देखील सुरू करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभिलेखानुसार, राजभवन डिस्पेन्सरीची इमारत सन 1927 साली बांधण्यात आली. डिस्पेन्सरीची सुरुवात मात्र अन्यत्र झाली असावी व ती 1927 साली सध्याच्या इमारतीमध्ये आली असावे असे दिसते. त्यामुळे राजभवन डिस्पेन्सरीला किमान 100 वर्षांचा इतिहास आहे हे सिद्ध होते. उपलब्ध कागदपत्रांवरून देखील त्याची पुष्टी होते.
जुन्या पद्धतीच्या टुमदार आरोग्य केंद्राची आठवण देणाऱ्या या डिस्पेन्सरीचे नाव ‘स्वास्थ्य कुटीर’ असे ठेवण्यात आले. परंतु ते नाव नक्कीच स्वातंत्र्योत्तर काळात ठेवण्यात आले असावे. राजभवन येथील डिस्पेन्सरीचे नूतनीकरण झाले असले तरीही ती बऱ्याच अंशी आपले मूळ रूप टिकवून आहे.
पूर्वी डिस्पेन्सरीसोबत ‘इन-हाऊस’ नर्सिंग होम देखील होते. राजभवन डिस्पेन्सरीमध्ये जन्म झालेल्या बालकांचे ‘Register of Births, Government House’ देखील या ठिकाणी ठेवले जायचे. या रजिस्टरमध्ये 1929 पासून जन्माच्या नोंदी दिसून येतात. आज ‘स्वास्थ्य कुटीर’मध्ये राजभवनाचे निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सेस अटेंडंट असे मिळून 5-6 आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत.
ही डिस्पेन्सरी राज्यपाल व त्यांच्या कुटुंबियांना, राजभवन येथे येणाऱ्या अति महत्वाच्या अतिथींना तसेच राजभवन येथील कर्मचारी अधिकारी, पोलीस व कामगारांना वेळोवेळी वैद्यकीय सेवा देत असते किंवा गरजेनुसार त्यांना मोठी रुग्णालये व तज्ज्ञ डॉक्टर यांच्याशी समन्वय साधून देते.
जून 1987 साली ‘सरहद्द गांधी’ खान अब्दुल गफ्फार खान हे आपल्या वार्धक्य काळात आजारी असताना मुंबई येथे वैद्यकीय तपासण्यांसाठी आले होते. त्यावेळी ते राज्यपालांचे अतिथी म्हणून राजभवन येथील अतिथीगृहात थांबले होते.
बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. बी. के. गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. त्यांना भेटण्यासाठी राज्यपाल डॉ. शंकर दयाल शर्मा व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण गेले होते. या आणि अशा हॉस्पिटलसंबंधी कार्यात राजभवन डिस्पेन्सरीची भूमिका समन्वयाची असते.
प्रथेनुसार राज्यपालांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नामवंत मानद (Honorary) डॉक्टरांचे मंडळ असते. राज्यपालांचे मानद डॉक्टर असणे हे बहुमानाचे समजले जाते. मंडळातील डॉक्टर्स व विशेषज्ञ गरजेनुसार मा. राज्यपाल यांना तसेच राजभवनाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांना वैद्यकीय सल्ला देतात.
साधारण 1965-1970 पर्यंत डिस्पेंसरी जवळच्या आणखी दोन रूम्स डिस्पेन्सरीचा भाग होत्या. ताप, मलेरिया, टायफॉइड आदी आजारांसाठी डॉक्टर संबंधित रुग्णाला या ठिकाणी दिवसभरासाठी भरती करुन घेण्याची देखील सोय होती, असे सेवानिवृत्त लोक सांगतात. त्याकाळचे ते ‘डे -केअर’ सेंटर होते!
पूर्वी पावसाळ्यात राज्यपालांचा मुक्काम 3 ते 4 महिने पुणे येथे असायचा. त्यामुळे पुणे येथे गणेशखिंड परिसरात असलेल्या राजभवन येथे देखील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, मुलांसाठी शाळा व सर्वांसाठी डिस्पेन्सरी होती. कालांतराने मुंबई व पुणे राजभवनातील प्राथमिक शाळा बंद झाल्या. पुणे येथील डिस्पेन्सरी देखील बंद झाली. परंतु, मुंबई राजभवनातील डिस्पेन्सरी आजही कार्यरत आहे व बऱ्याच प्रमाणात तिचे आधुनिकीकरण झाले आहे.
सन 2002-2004 या काळात मोहम्मद फझल महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यावर त्यांनी पुरुष नसबंदीला चालना देण्यासाठी डिस्पेन्सरीच्या ठिकाणी ‘लोकसंख्या नियंत्रण कक्ष’ सुरू केला. या कक्षाच्या माध्यमातून किमान 5 ते 6 पुरुष नसबंदीचे कॅम्प या ठिकाणी घेण्यात आले. जे पुरुष कर्मचारी नसबंदी करण्यासाठी पुढे येत, त्यांना त्यावेळी 3 हजार रुपये प्रोत्साहन भत्तादेखील फजल यांनी जाहीर केला होता.
डिस्पेन्सरीच्या माध्यमातून पोलिओ निर्मूलनासाठी लसीकरण मोहीम नियमितपणे राबविण्यात आली. मार्च 2020 साली करोना महामारीच्या काळात राजभवन डिस्पेन्सरीने आणि येथील डॉक्टर आणि नर्सेस यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली.
राज्यपालांच्या कार्यक्रमांच्या वेळी, शपथविधीच्या वेळी राज्यपालांच्या निमंत्रित – अभ्यागतांचे आगमनाबरोबर थर्मल गनच्या मदतीने तापमान पाहणे आणि त्यांनी मास्क लावले आहे की नाही याची खातरजमा करणे ही कामे देखील डिस्पेन्सरीतील आरोग्य सेवकांनी पार पाडली. राजभवन डिस्पेन्सरीच्या वतीने वेळोवेळी येथील कर्मचारी – अधिकाऱ्यांसाठी आरोग्य विषयक तपासणी शिबिरे, चर्चासत्रे व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेकदा रक्तदान शिबिरांचे देखील आयोजन करण्यात आले.
आपल्या शतकी वाटचालीमध्ये डिस्पेन्सरीतील डॉक्टर्स बदलले, आरोग्य सेवक बदलले, औषधे – उपकरणे बदलली. परंतु आज देखील ही डिस्पेन्सरी राजभवनाच्या आरोग्य रक्षणाचे कार्य अव्याहतपणे करीत आहे.
लेखन – श्री. उमेश काशीकर (माननीय राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी, राजभवन मुंबई)