आज प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. स्वतःला स्वयंप्रेरित ठेवण्याच्या ध्यासानेच या स्पर्धेच्या युगात स्वतःला आघाडीवर ठेवणे साध्य होऊ शकते. स्वतःला स्वयंप्रेरित ठेवण्यासाठी ज्या गोष्टी पूरक असतील त्या गोष्टींचा अवलंब केला गेला पाहिजे. आजच्या तरूणाईला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मोठ्या प्रमाणात स्वयंप्रेरणेची आवश्यकता आहे. यामुळे तरूणांनी स्वयंप्रेरणेने प्रेरित होत स्वप्नपूर्तीसाठी कष्ट घेतले, तर त्यांना हवी असलेली आयुष्यातील उंची ते प्राप्त करू शकतात.
वेळ ही नेहमी प्रवाही असते. असे असताना जीवनात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे वेळेला दोष देणे टाळले पाहिजे. कारण वास्तवात घडलेल्या घटनांचा स्विकार करत वेळेसोबत जुळवून घेण्याची वर्तमान काळातील गरज असते. अशावेळी घडलेल्या घटनांच्या परिणाम व यावर उपाय काढण्याचा मार्ग जाणून घेतला पाहिजे. यातूनच आपले जगणे प्रवाहित ठेवण्यासाठी नवी वाट निवडली जाऊ शकते.
रोज स्वतःला प्रेरित ठेवणे हे जितके आव्हानात्मक असते तितकेच ते सोपेसुद्धा असते. कारण, आपल्या विचारातूनच आपण आपली मानसिकता विकसित करत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना काहीवेळा अचानक असा एखादा प्रसंग घडतो, ज्यामुळे आपल्याला त्या प्रसंगावर मात करणे, त्या परिस्थितीतून मार्ग काढणे अवघड आहे, असे वाटते. जणूकाही सर्व संपले आहे, असेसुद्धा काही जणांना वाटते.
जीवनात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांमुळे मनाला उदास वाटणे, भविष्याची चिंता, भीती वाटणे तसेच करिअरबाबत प्रश्नचिन्ह यांसारख्या गोष्टी मनात गोंधळ निर्माण करत असतात. मात्र, अशावेळी स्वतःला स्थिर ठेवणे ही त्याकाळाची गरज असते. खरंतर, आपल्या अंगी असलेली स्थिरता हे जीवनात उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीवर मार्ग काढण्याचा उत्तम पर्याय असू शकते. त्याबळावरच आपण त्यावेळी स्वतः तटस्थ होत त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.
सरत्या वर्षाला निरोप दिल्यानंतर नव्या वर्षाची नव्या उत्साहाने सुरूवात करण्यासाठी स्वयंप्रेरणा ही संकल्पना आत्मसात करूयात आणि वर्षभरात कितीही कठीण प्रसंग आले तर त्या प्रसंगांनी विचलित न होत जीवनातील स्थिरतेने त्यावर मार्ग काढूयात, अशा विचारासह नव्या वर्षाची सुरूवात करूयात… नूतन वर्षाच्या मनापासून सदिच्छा!
- चंद्रकांत दुसाने
मो.नं. 7755929833/7798339871