मुंबई, 15 जानेवारी : राज्यात महानगरपालिकांसाठी मतदान पार पडत आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा करणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरून विरोधकांकडून राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा करणाऱ्या व्हिडीओंवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितलंय.
View this post on Instagram
दिनेश वाघमारे पुढे म्हणाले की, बोटावरची शाई जाते की नाही याची निवडणूक आयोगाने खात्री केली आहे. आयोगाच्या कर्मचाऱ्याच्या बोटावर शाई लावून ती जाते की नाही याची खातरजमा केली आणि ती शाई गेली नाही अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली. दरम्यान, बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अशा व्हिडीओंवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. यासोबतच ज्यांनी कोणी यांसदर्भात तक्रार दिल्यास संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
संपूर्ण निवडणूक प्रशासन सत्तेसाठी काम करतंय – राज ठाकरे
मुंबईत आज सकाळी मतदान करून परतलेल्या काही मतदारांच्या बोटांवरील शाई सहजपणे पुसली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले असून, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये अनेक मतदारांच्या बोटांवरील शाई निघून जात असल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही तीव्र प्रतिक्रिया देत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मार्कर पेनचा वापर करून शाई लावली जात असली, तरी सॅनिटायझर लावल्यास ती पुसली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. उमेदवारांवर मतदारांपर्यंत पोहोचण्यावर निर्बंध घालण्यात आले असताना, संपूर्ण निवडणूक प्रशासन सत्तेसाठी काम करत असल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी केला.
राज्य निवडणूक आयुक्तांना निलंबित करा – उद्धव ठाकरे
राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी थेट हल्लाबोल केला. गणेश नाईक यांचे मतदान केंद्र ‘फरार’ असल्याचा आरोप करत त्यांनी संबंधित निवडणूक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी दुबार मतदारांची नावे आढळून येत असल्याचा दावा त्यांनी केला. मतदान केंद्रांवर केवळ शाईच पुसली जात नाही, तर लोकशाहीच पुसली जात असल्याचा गंभीर आरोप करत, शाई पुसली गेल्यानंतरही मतदान होणार नाही, याची खात्री निवडणूक आयोग कशी देऊ शकतो, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
पराभवाचा दोष कोणावर टाकायचा याची विरोधकांकडून पुर्वतयारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना सांगितले की, मतदानासाठी मार्करचा वापर करायचा की अन्य कोणती पद्धत अवलंबायची, याचा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो आणि यापूर्वीही मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रक्रियेबाबत कोणाला आक्षेप असल्यास, निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी, असेही ते म्हणाले. उद्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोष कोणावर टाकायचा, याचीच पूर्वतयारी काहीजण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मला देखील मार्कर पेन लावण्यात आला असून, माझ्या बोटावरील मार्कर पेनची शाई पुसली जात नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
Video |‘…म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलंय, ही चांगल्या लोकशाहीची लक्षणं नाहीत’, सत्तेचा किती गैरवापर करावा, यालाही काही मर्याद्या हव्यात… – मतदान केल्यानंतर राज ठाकरेंचा माध्यमांशी संवाद






