मुंबई, 26 जानेवारी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला पायी मोर्चा नवी मुंबईतील वाशीत पोहचला आहे. दरम्यान, मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत.
राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने नवीन अध्यादेश घेऊन राज्य सरकारचे शिष्टमंडळ वाशीकडे रवाना झाले. या शिष्टमंडळात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड आणि मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव डॉ. अमोल शिंदे आणि सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
नवा अध्यादेश तयार करण्यासाठी बैठक –
मराठा जमाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात येईल.
या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : शेतकऱ्यांच्या हिताला व जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील