संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 28 फेब्रुवारी : पारोळा तालुक्यातील काही भागात सोमवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, काही गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने तहसील व कृषी विभाग यांना निवेदन दिले.
नुकसान भरापाईसाठी निवदेन –
पारोळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, बाजरी, मका, गहू, हरभरा, लिंबूवर्गीय फळ, पिके, पपई, टरबूज तसेच शेतात बसवलेले सौर ऊर्जा पंपच्या प्लेट्सचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तत्काळ पंचनाम्यांची कार्यवाही करुन शेतकऱ्यांना नुकसानीचा लाभ मिळावा, यासाठी स्व. शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी विभागात भामरे व नायब तहसीलदार अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ .शांताराम पाटील, महेश पाटील, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, आदींसह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
हेही वाचा : शेतकऱ्यांचे अवकाळीने पावसाने नुकसान, पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी