जळगाव : काही दिवसांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात एका ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना घडली होती. यानंतर आता आणखी एक धक्कादायक घडली. सुरतवरून प्रयागराजकडे निघालेल्या ताप्तीगंगा एक्सप्रेसवर रविवारी अज्ञात तरुणाने दगड भिरकवला. जळगाव स्टेशनजवळील शिवाजीनगर उड्डाण पुलाच्या पुढे ही घटना घडली.
दगडफेकीच्या या घटनेत ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या एसी कोचची काच फुटली. या प्रकरणी जळगाव स्टेशनवरील रेल्वे पोलीस दल स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
जळगाव स्टेशनवरून प्रयागराजला जाणाऱ्या ताप्तीगंगा एक्स्प्रेस (क्रमांक 19045) या गाडीवर काल रविवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुल सोडल्यानंतर अंदाजे 20 ते 25 वर्षीय तरुणाने दगड मारला.
यामुळे ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या बी-6 च्या डाव्या बाजूच्या खिडकीचा काच फुटला. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. दरम्यान, या घटनेची माहिती भुसावळ स्थानक प्रमुखांना मिळाली. यानंतर त्यांनी कोचची फुटलेली काच तत्काळ बदलली. तर भुसावळ स्टेशन येथील रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एन. के. सिंह यांनी याबाबत पंचनामा केला.
सुरतवरून आलेली ताप्ती गंगा एक्सप्रेसने जळगाव स्टेशन सोडताच काही मिनीटात गाडीवर दगडफेक झाली. दगडफेकीच्या या घटनेमुळे बी-6 कोच मधील प्रवाशी चांगलेच भयभीत झाले. यात मुलांसह महिला, पुरुषांचा समावेश होता.
या ताप्तीगंगा एक्सप्रेसमधील बी-6 कोचमध्ये बसलेल्या प्रवाशाने काल शेअर केलेल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की, आम्ही सुरतवरुन प्रयागराजसाठी निघालो. महाकुंभसाठी सर्व प्रवाशी आमच्या सोबत आहेत. जळगाववरुन गाडी निघाल्यानंतर 3 किलोमीटर पुढे काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. आम्ही रेल्वे मंत्र्यांना नम्र विनंती करतो की, आम्हाला सुरक्षा देण्यात यावी.’
महाकुंभाच्या पहिल्या शाही स्नानासाठी उधना रेल्वे स्थानकावरून निघालेल्या या गाडीच्या बी-6 कोचमध्ये सुरतचे 36 भाविक प्रवास करत होते. यामध्ये 5 मुले, 6 वृद्ध, 13 महिला आणि 12 पुरुषांचा समावेश आहे. संपूर्ण ट्रेनमध्ये सुमारे 45 भाविक प्रयागराजला जात होते. दरम्यान, जळगाव रेल्वे पोलीस दलाचे उपनिरीक्षक मनोज सोनी यांनी घटनास्थळावर पाहणी केली. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – आजपासून पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील माहेजीदेवी मातेच्या यात्रोत्सवाला प्रारंभ