जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा होळ येथील वरिष्ठ शिक्षक साहेबराव चौधरी यांचा आज जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. आज जिल्हा परिषद जळगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते आज पाचोरा तालुक्यातील जि. प. शाळा होळ येथील शिक्षक साहेबराव चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करत 100% प्रगत वर्ग केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सीईओ मीनल करनवाल यांच्या हस्ते त्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
जि. प. होळ शाळा जळगाव जिल्ह्यात 1 नंबर –
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानात पाचोरा तालुक्यातील जि. प. शाळा होळ या शाळेला जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. शाळेला 11 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. येथील शिक्षकांच्या मेहनतीच्या बळावर शाळेला हा पुरस्कार काही महिन्यांपूर्वी मिळाला. यामध्ये या शाळेतील शिक्षक साहेबराव चौधरी यांचेही मोठे योगदान आहे. साहेबराव चौधरी यांची ख्याती एक आदर्श शिक्षक अशी आहे. त्यामुळे एका खऱ्या आदर्श शिक्षक, विद्यार्थीप्रिय, गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सदैव तत्पर असणारे साहेबराव चौधरी यांचे परिसरात अभिनंदन केले जात आहे.