नाशिक, 14 नोव्हेंबर : नाशिकमधील कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रशासन अगदी वेगाने कामाला लागले असून हा कुंभ स्वच्छ आणि सुंदर तसेच सुरक्षितही करायचा आहे. कुंभात कुठेही अप्रिय घटना घडणार नाही आणि गुन्हेगारीच्या घटना घडणार नाहीत, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असल्याचेही मंत्री महाजन म्हणाले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या सुमारे सहा हजार कोटींच्या विकास कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री गिरीश महाजन बोलत होते.
View this post on Instagram
मंत्री गिरीश महाजन यांनी केलं नाशिक पोलिसांचं कौतुक –
ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे तसेच खासदार शोभा बच्छाव यांची उपस्थिती होती. यावेळी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गुन्हेगारांवरील कारवाईबद्दल नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
10 ते 15 हजार गुन्हेगार नाशिक सोडून पळाले –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेशानुसार, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वात मागील दीड ते दोन महिन्यात सत्ताधारी व विरोधी पक्षातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींवर कारवाई केली गेली. कारवाईच्या सत्रामुळे 10 ते 15 हजार गुन्हेगार नाशिक सोडून पळाले. दरम्यान, पळालेली मंडळी देशातील विविध देवस्थानांना भेटी देत देवाचा धावा करीत असल्याचेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.






