जळगाव, 6 जुलै : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता जळगाव जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नदीच्या पुलावरून बस जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे बॅरिकेड तोडून बस थेट नदीत कोसळली. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. तर अनेक 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
काय आहे संपूर्ण घटना –
जळगाव जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. इंदूर ते जळगाव या मार्गावर आज रविवारी पहाटे खासगी बसचा भीषण अपघात झाला. यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ असलेल्या मोर नदीच्या पुलावरून ही बस जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि त्यामुळे बॅरिकेड तोडून बस थेट नदीत कोसळली. या भीषण अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू आहे. तसेच 20 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
ही खासगी बस इंदूर इथून भुसावळच्या दिशेने निघाली होती. एमपी09-9009 या क्रमांकाची ही खासगी बस आहे. दरम्यान, आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास फैजपूर ते भुसावळ दरम्यान आमोदा गावाजवळ असणाऱ्या मोर नदीच्या पूलावरून जाताना खासगी बस नदीत कोसळली. दुर्दैवाने या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघाताच्या या घटनेनंतर अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
आजच्या या अपघातानंतर आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पूल परिसरातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा पूल मोडकळीस आला आहे. मागील आठ दिवसांमध्ये या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. नेहमी याच ठिकाणी वाहनांचे अपघात होत असल्याने नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले असून याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.