मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार हे दुपारी 2 वाजता राज्याचा 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. महायुती सरकारने निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर या नवीन सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस विजय मिळवून देण्यात सरकारने दिलेल्या मोफत योजनांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यामध्ये हा अर्थसंकल्प सादर करताना वाढता खर्च, महसुली तूट, वाढते कर्ज, देणी व वाढत्या प्रशासकीय खर्चावर नियंत्रण याचे आव्हान वित्तमंत्र्यांसमोर असेल. आज दुपारी अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. याआधी शेषराव वानखेडे यांच्या नावे 13 अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम आहे. तर अजित पवार यांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार –
सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. पुन्हा सत्तेत निवडून आलो तर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल, असे आश्वासन महायुती सरकारच्या वतीने देण्यात आले होते. दरम्यान, निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आणि राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार आले. निवडणुकीनंतर राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्री 2100 रुपये देण्याबाबतची घोषणा करणार का? याकडे लक्ष लागले आहे.