इसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यात एकाच रात्री तब्बल 6 ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत, माहेजी, वरसाडे या गावात चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल 6 ठिकाणी घरे फोडून 16 तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के आणि 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथेही चोरट्यांनी आपला हात साफ केला. दरम्यान, एकाच रात्री तब्बल सहा ठिकाणी घरफोडीची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं –
पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील धरमसिंग जयसिंग पाटील हे पुणे येथे त्यांचा मुलगा एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याठिकाणी गेले होते. त्यामुळे ते पत्नीसह पुण्यात गेले होते. त्यांचे घर बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने, रमेश गुलाबसिंग पाटील यांच्या बंद घरातून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने आणि 40 हजार रुपयांची रोकड, प्रताप बाबुलाल पाटील यांच्या घरातून 15 ग्रॅम सोने, 20 भार चांदीचे दागिने आणि 2 लाख 60 हजार रुपयांची रोकड आणि विठ्ठल विजयसिंग पाटील यांच्या घरातून 10 हजार रुपये रोख असे एकूण तब्बल 16 तोळे सोन्याचे दागिने आणि 3 लाख 10 हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
यासोबतच पाचोरा तालुक्यातील माहेजी येथील मेडिकल शॉप, एक बंद घर आणि वरसाडे येथील दोन बंद घरेही चोरट्यांनी फोडली. मात्र, याठिकाणाहून त्यांच्या हाती काही लागले नसल्याची माहिती मिळाली आहे.
पाचोरा तालुक्यात एकाच रात्री 6 ठिकाणी झालेल्या या घरफोडीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच घटनास्थळी जळगाव येथील फिंगरप्रिंट तज्ञ, श्वान पथकही आल्याची माहिती मिळाली आहे. तर घरफोडीच्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.