ईसा तडवी, प्रतिनिधी
लोहारा (पाचोरा), 28 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील ज्वेलर्स दुकानात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे.
नेमकी काय आहे घटना? –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील लोहारा येथे पहूर येथील विशाल शंकर सोनावणे यांच्या मालकीचे ओम साई ज्वेलर्स आहे. या दागिन्यांच्या ज्वेलर्स दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील 72000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केली आहे. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसहा वाजता ते 28 ऑक्टोबर रात्रीचे 09.30 वाजेच्या दरम्यान घडली असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, तक्रारदारांनी तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद मोरे करित आहेत.