मुंबई : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भाजपने कालच आपल्या 3 उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाटेवर आलेल्या प्रत्येकी 1 जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये शिवसेना उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून खान्देशातील नेत्याला शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.
विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीनं चंद्रकांत रघुवंशी यांना संधी देण्यात आली आहे. आक्रमक नेता म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांची ओळख आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमश्या पाडवी विजयी झाले होते. तर विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान धडगाव इथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी शब्द पाळल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात चंद्रकांत सुर्यवंशी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी दिल्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली गेली आहे.
अशी राहिली आहे चंद्रकांत रघुवंशी यांची राजकीय कारकीर्द –
चंद्रकांत रघुवंशी यांनी हे धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 21 मार्च 1992 ते 1997 आणि 21 मार्च 1997 ते 31 डिसेंबर 1998 या कालावधीत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती. यानंतर त्यांना काँग्रेसकडून 1 जानेवारी 1998 ते 31 डिसेंबर 2003 या कालावधी पहिल्यांदा विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळाली होती. तसेच 1 जानेवारी 2004 ते 1 जानेवारी 2010 या कालावधीसाठी त्यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवले होते. तसेच 24 एप्रिल 2014 ते 2 ऑक्टोंबर 2019 दरम्यान काँग्रेसने त्यांना तिसऱ्यांदा विधान परिषदेवर पाठवलं होतं.
मागील 15 वर्षांपासून एकहाती सत्ता –
चंद्रकांत रघुवंशी यांनी तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्षपद भूषवलं आहे. चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी सलग चार वेळा नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा होत्या. त्यांचे चिरंजीव राम रघुवंशी हे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि सदस्य होते. मागील 15 वर्षांपासून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार नगरपालिकेवर त्यांची एक हाती सत्ता अबाधित आहे.
दरम्यान, चंद्रकांत रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर नंदुरबार आणि धडगाव पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात गेली. तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेवर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली अनेक सदस्यांची निवड झाली.
हेही वाचा – घरकुलांना मोफत वाळू मिळणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती, नेमकं काय म्हणाले?