भुसावळ, 2 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना भुसावळातून धक्कादायक घटना समोर आली. भुसावळात शुक्रवारी एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली तर कुख्यात गुन्हेगाराचा मध्यरात्री खून करण्यात आला.
सख्ख्या भावांची निर्घृण हत्या –
भुसावळनजीक असलेल्या कंडारीत जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेने भुसावळसह जळगाव जिल्हा हादरला आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शांताराम भोलानाथ साळुंखे (28) व राकेश भोलानाथ साळुंखे (33) अशी हत्या झालेल्या दोघे भावांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेत अजून दोन जण गंभीर जखमी झाले असून गोदावरी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पुर्ववैमनस्यातून खून? –
जुन्या व्यावसायिक वादातून ही घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे पो. नि गजानन पडघम व बाजारपेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी परिसरातील पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला.
कुख्यात निखिल राजपूतचा खून –
भुसावळातील दोन सख्ख्या भावांच्या हत्येचा तपास सुरू होत नाही. तेवढ्यातच भुसावळात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार निखिल राजपूतची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री निखील हा घरी आल्यानंतर काही संशयितासोबत पाण्याच्या टाकीच्या टेरेसवर झोपला असता त्याचा वाद झाला व वादातून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करीत खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी –
विशेष म्हणजे 24 तासांपूर्वीच निखीलसह त्याच्या सहकार्यांनी बाजारपेठ पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता तर श्रीराम नगर भागातील पाण्याच्या टाकीवर काही संशयितांमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा वापर होवून त्याच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार करण्यात आल्याने त्याची हत्या झाली. पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यासह धमकी देणे, खंडणी वसुल करणे, मारहाण करणे यासह गंभीर गुन्ह्यात निखील राजपूत हा प्रमुख संशयित आरोपी होती.