चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 7 जून : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाला राज्यात अपेक्षित असे यश मिळाले नसले तरी खान्देशातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात भाजपला अपेक्षित यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून स्मिता वाघ आणि रक्षा खडसे या निवडून आल्याने त्यांनी भाजपचा गड कायम राखला आहे. पण जळगाव जिल्ह्यातील एकूण 3 व्यक्ती लोकसभेत खासदार म्हणून जाणार आहेत. तर एका उमेदवाराचा निवडणूक पराभव झाला आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात जळगाव आणि रावेर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत दोन्ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस पाहायला मिळाली. दरम्यान, जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ यांनी महाविकास आघाडीच्या करण पवार यांचा पराभव केला. तर दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्याच रक्षा खडसे यांनी महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे स्मिता वाघ आणि रक्षा खडसे यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या आणखी एका उमेदवाराने पुन्हा खासदारकीची निवडणूक जिंकली आहे.
सी. आर. पाटील असे त्यांचे नाव आहे. सी. आर. पाटीलल हे मूळ जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मात्र, ते सध्या गुजरात भाजपचे प्रमुख आहेत आणि नवसारी मतदारसंघातून भाजपकडून विजय मिळवला. यामुळे स्मिता वाघ, रक्षा खडसे आणि सी. आर. पाटील असे, जळगाव जिल्ह्यातील एकूण तीन व्यक्ती खासदार हे संसदेत जाणार आहेत.
कोण आहेत सी. आर. पाटील? –
मुळचे भुसावळ तालुक्यातील आणि सध्यास्थितीत गुजरात येथे रहिवासी असलेले असलेले सी. आर. पाटील हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मध्यंतरी पार पडलेल्या गुजरात निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व विजयाचे ते शिल्पकार आहेत 2009 साली ते नवासरीचे खासदार बनले आमि 2014 तसेच 2019 सालच्या निवडणुकीतही त्यांनी दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.
उज्ज्वल निकमांचा पराभव अन् चौकार हुकला –
माजी सरकारी वकील आणि मुळचे जळगाव जिल्ह्याचे रहिवासी उज्ज्वल निकम यांनी यंदा भाजपकडून उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याकडून निकम यांचा पराभव झाला. दरम्यान, उज्ज्वल निकम यांनी या निवडणुकीत बाजी मारली असती तर जळगाव जिल्ह्यातून एकूण चार खासदार संसदेत गेले असते. मात्र, उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आणि त्यांच्या या पराभवाच्या रुपाने भाजपचा चौकार हुकला आहे.
हेही वाचा : Smita Wagh : विजयानंतर स्मिता वाघ Special Interview