ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 19 मे : ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ भडगाव येथे 24 मे रोजी तर पाचोरा येथे 25 मे रोजी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या तिरंगा रॅलीत सर्वपक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांसह तालुक्यातील देशप्रेमी जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, तालुकाप्रमुख विनोद तावडे आदी उपस्थित होते.
आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? –
आमदार किशोर आप्पा पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात जी युद्धजन्य परिस्थिती सर्व देशाने पाहिली. त्यातून नव्या पिढीने नवीन जल्लोष केलाय. मला वाटतं की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरोखर 56 इंचाची छाती दाखवयाचं काम यामाध्यमातून केलंय. यासोबतच भारतीय सैन्याने देखील पाकिस्तानला नमोहरण करण्याचं काम आपल्या सैन्याने केलं.
पाचोरा-भडगावमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन –
देशभरासह राज्यात तिरंगा रॅलीच्या माध्यमातून जल्लोष केला जातोय. यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात शिवसेनेच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. भडगाव येथे 24 मे रोजी तर पाचोरा येथे 25 मे रोजी सकाळी 10 वाजता ही तिरंगा रॅली निघणार आहे. दरम्यान, या तिरंगा रॅलीचे जरी शिवसेनेने आयोजन केले असले तरी सर्वपक्षीय पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच देशप्रेमी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
हेही वाचा : ‘पती आमदार झाले अन् पत्नीने बालाजीला बोललेला नवस फेडला;’ अर्जुन खोतकर यांच्या फेसबूक पोस्टचा नेमका अर्थ काय?