जालना, 22 सप्टेंबर : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मराठ आंदोलक मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. जरांगे यांचा आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. असे असताना जरांगे यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून अखंड मराठा समाजाच्यावतीनेही बंदची हाक दिली आहे.
मनोज जरांगे यांची प्रकृती कशी? –
मनोज जरांगे यांची काल आमरण उपोषण दरम्यान प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी बरी झाली आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
जालन्यात सुरू असलेली उपोषणे –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. तसेच आंतरवली सराटी मध्ये ॲड मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त –
जालन्यातील वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी काल रस्ता रोको केला. दरम्यान, याठिकाणी ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला होता. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असताना संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात होती. दरम्यान, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला.
हेही वाचा : जामनेर मतदारसंघ गिरीश महाजनांना नेमका कसा मिळाला, एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण..