मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारांच्या प्रचारासाठी बड्या राजकीय नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. अशातच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असून मोदींच्या तीन तर राहुल गांधींच्या दोन सभा पार पडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा –
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज तीन जाहीर सभा होणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची पुण्यातील एस.पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार आहे. गेल्यावेळी पावसामुळे मोदी यांच्या सभेत व्यत्यय आल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती. मात्र, भाजपने यावेळी या सभेची जय्यत तयारी केली आहे. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार आज मोदी पुण्यात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यासह आज चिमूर, सोलापूर येथे देखील जाहीर सभा होणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील महाराष्ट्र दौऱ्यावर असून अमित शाह यांच्या मुंबईत दोन सभा होणार आहेत. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा अकोला, अमरावती व नागपुरात आयोजित करण्यात आल्या आहेत.
राहुल गांधींच्या दोन सभा –
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील आज राज्याच्या दौऱ्यावर असून उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या सभा पार पडणार आहेत. राहुल गांधी यांच्या बुलढाण्यातील चिखली येथे तसेच गोंदिया येथे सभा होणार आहेत. राहुल गांधी आज हे येथून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 3 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारासाठी पाचोरा येथे तर सायंकाळी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव ग्रामीणमध्ये त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.