जळगाव, 21 ऑक्टोबर : जळगाव जिल्ह्यात एकीकडे परतीच्या पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाने झाले आहे. तर दुसरीकडे आज जळगाव जिल्ह्यासह मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यांत सकाळी उन आणि संध्याकाळी पाऊस असा हवामानातील बदल पाहायला मिळतोय.
राज्यातील या भागाात पावसाची शक्यता –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह कोकणमधील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यमतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज काय? –
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली असून आगामी काही दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात आज पुन्हा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत –
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 6 ते 7 हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, ज्वार, सोयाबीन तसेच मका पिकांसह केळीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, परतीच्या पावसाचा शेतीपिकांचे होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : MLA Kishor Appa Interview : पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांची स्फोटक मुलाखत