पंढरपूर, 17 जुलै : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली. हे बा…विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव. कष्टकरी, सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर,असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी घातले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे –
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे, असे मागणे मागितल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात ही सुविधा सुरू होणार –
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरातही टोकन दर्शन सुरू होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. यासाठी शासनाकडून 103 कोटींचा निधी उपलब्ध करुन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तिरुपतीमध्ये सकाळी 5 वाजेपासून टोकन सेवा सुरू होते. त्यासाठी टोकन घेऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड दाखवून रांगेत तासंतास उभं न राहता थेट दर्शन घेता येते. त्याच पार्श्वभूमीवर आता पंढरपुरातही ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनासाठी मंजूर 73 कोटी 80 लाखांच्या निधीअंतर्गतची सर्व कामे उत्कृष्ट आहेत. तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर मंदिरात दर्शन मंडप, टोकन दर्शन पद्धत राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंदिर समितीच्या 103 कोटींच्या आराखड्यास मान्यता देण्यात येत आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आषाढीवारी निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने 4 ठिकाणी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा आतापर्यंत 8 लाख नागरिकांनी लाभ घेतला असून, 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. पंढरपुरात लवकरच 1 हजार बेड क्षमतेचे नवीन रुग्णालय बांधण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार वितरण व समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्यदूत या वार्षिकीचे प्रकाशन मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यंदा कोण ठरलं मानाचे वारकरी –
यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे हे मानाचे वारकरी ठरले आणि त्यामुळे या दाम्पत्याला मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला. त्यांच्यासोबत पूजा करण्याचे सौभाग्य मिळणे हा माझ्यासाठी बहुमान ठरला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

यांची होती उपस्थिती –
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – डॉ. पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट, प्रशिक्षण कालावधीला मिळाली स्थगिती, मसुरीत परतण्याचे आदेश