जळगाव : मुक्ताईनगरमधील घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली होती. आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुक्ताईनगर छेडछाडप्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. तसेच एक अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना माहिती दिली.
7 पैकी 4 जणांना अटक –
पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी माध्यमांना सांगितले की, 28 फेब्रुवारीला कोथळी गावात घडलेल्या घडनेत काल एफआयआर दाखल करण्यात आला. एफआयआरमध्ये पोस्को कलम, त्यानंतर विनयभंग, आयटी अॅक्ट ही सर्व कलमे दाखल करण्यात आली. यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यासोबतच आणखी एक अल्पवयीनला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 7 पैकी 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. उरलेल्या 3 आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.
अनिकेत भोई हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरुद्ध याआधी 4 गुन्हे आहेत. त्या चारही गुन्ह्यांचं स्वरुप मारहाण, दुखापतीच्या प्रकारचे होते. इतर ज्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या आरोपींवर याआधी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, अशी माहितीही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
काय आहे नेमकी घटना –
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली होती. यानंतर याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात 7 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांनी दिला होता कडक कारवाईचा इशारा –
याबाबत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, अशाप्रकारे छेडखानी करणं, सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे त्यांना त्रास देणं, हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा लोकांना, त्याठिकाणी माफी देता कामा नये. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई होईल. दरम्यान, आता मुक्ताईनगर छेडछाडप्रकरणी पोलिसांनी आता तिघांना अटक केली आहे. तसेच यामध्ये मुख्य आरोपी अनिकेत भोई याचाही समावेश आहे. तसेच एक अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा – संतापजनक! केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, नेमकं काय घडलं, संपूर्ण घटनाक्रम..