नवी मुंबई : गेल्या काही दिवसात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेल्याच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.
हायड्रा गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहतूक नियंत्रण करीत असताना कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ही घटना काल गुरूवारी महापे उड्डाणपुलाखाली घडली. गणेश पाटील असे मृत्यू झालेल्या वाहतूक पोलीस हवालदाराचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण घटना –
वाहतूक पोलीस हवालदार गणेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होते. सध्या ते महापे या ठिकाणी आपली सेवा बजावत होते. दरम्यान, हा भाग एमआयडीसीमध्ये येतो. तसेच या ठिकाणी जड अवजड वाहनांची दिवसरात्र वर्दळ असते. त्यासोबत एमआयडीसी मध्ये काम करणाऱ्या हजारो कामगार अधिकारी यांच्या गाड्यांचीही याठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक नियंत्रण करणे अनेकदा जिकरीचे होते. त्यातून अनेक अपघात होतात. यातच काल गणेश पाटील या वाहतूक हवालदाराचे अपघाती निधन झाले.
सकाळी दहापासून ते वाहतूक बिट चौकी नजीकच्या उड्डाणपुलाखाली आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी एक हायड्रा गाडी त्याठिकाणी वळण घेत असताना त्याला मार्ग दाखवत असताना हायड्रा गाडी चालकाच्या बेजबाबदारपणामुळे गणेश पाटील यांचा अपघात झाला. अपघात होताच तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी हायड्रा चालक राजेश गौड विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली.
मृत हवालदार पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रहिवाशी –
मृत्यू झालेले नवी मुंबई वाहतूक शाखेतील पोलीस हवालदावर गणेश आत्माराम पाटील (शिरसाठ) हे पाचोरा तालुक्यातील सामनेर गावातील मूळ रहिवासी होते. ते सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आत्माराम दगा पाटील यांचे लहान चिरंजीव होते. दरम्यान, गणेश आत्माराम पाटील यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला जात आहे.