जळगाव, 12 नोव्हेंबर : दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर झालेल्या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहे. रेल्वे स्थानकं, बसस्थानकं आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक प्रवाशाची तपासणी सुरू असून संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींवर विशेष नजर ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महानगरी एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली. प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर गेले आणि संबंधित रेल्वेत सखोल तपासणी सुरू करण्यात आली.
महानगरी एक्स्प्रेसच्या टॉयलेटमध्ये “पाकिस्तान जिंदाबाद, आयएसआय जिंदाबाद, बॉम्ब फुटनेवाला है 12/11” असा खडूने लिहिलेला संदेश सापडल्याने ही अफवा पसरली. हा संदेश पाहताच रेल्वेतील प्रवासी घाबरले आणि तत्काळ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली.
प्रशासनाने तत्काळ सर्व यंत्रणांना अलर्ट केले आणि महाराष्ट्रातील भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर कसून चौकशी करण्यात आली. प्रवाशांच्या बॅगा, पिशव्या आणि सामानाची तपासणी करून सुरक्षा उपाययोजना अधिक कडक करण्यात आल्या.
तपासानंतर ही घटना कोणाच्यातरी खोडसाळ कृतीचा भाग असल्याचे स्पष्ट झाले असून, कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही. तरीदेखील रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या अफवेमुळे प्रवाशांना काही काळ भीती आणि गोंधळाचा सामना करावा लागला असला तरी सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : Video : पारोळा-एरंडोलमध्ये भाजप-शिवसेना युतीचं ठरलं! नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोणाचा?






