भडगाव, 30 जून : भडगाव तालुक्यातील गुढे येथील रहिवासी असलेल्या भारतीय सैन्यदलातील जवान राहुल गुढे यांना देशसेवा बजावत असताना मृत्यू झाला होता. आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवान राहुल श्रावण माळी (वय-40) हे भारतीय सैन्यदलात हवालदार पदावर कार्यरत होते. ते पत्नी आणि दोन लहान मुलांसह मिलेटरी सेंटरमध्ये वास्तव्यास होते. दरम्यान, भारत बांग्लादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथील काचरापाडा येथे त्यांचा देशसेवा बजावत असताना सैन्यसेवेत असताना अकस्मात मृत्यू झाला. यानंतर त्यांचे पार्थिव हे त्यांच्या गावी आणण्यात आले.
राजकीय नेत्यांची उपस्थिती –
यानंतर आज त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या वीर जवानाच्या अंत्यसंस्काराप्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्याचे आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ आदी राजकीय नेत्यांसह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
शहीद जवान राहुल माळी यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा शिव (वय-4) आणि शंभू (वय-दीड वर्ष), आई, वडील, दोन मोठे भाऊ, वहिनी आणि पुतणे असा परिवार आहे.