जळगाव/मुंबई, 3 जानेवारी : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात सोमवारपासून ट्रक-ट्रँकरचालकांनी सोमवारपासून संप पुकारला होता. देशभरासह राज्यात ठिकठिकाणी ट्रक-ट्रँकरचालकांनी रस्त्यावर उतरत कायद्याला जोरदार विरोध केला. या संपामुळे राज्यभरात पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली होती. दरम्यान, ट्रक चालक पुन्हा आपल्या कामावर रुजू होणार असल्य़ाची बातमी आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
जळगाव इंधन पुरवठा सुरळीत होणार –
ट्रक-टँकर चालकांनी संप मागे घेतला, ही चांगली बाब आहे. पण लगेच सर्व सुरळीत झालेले नाही. जळगाव जिल्ह्यात मनमाडवरून आज सकाळीच इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे ट्रँकल दाखल झाले आहेत. दरम्यान, ही परिस्थिती लवकरच सामान्य स्थितीत येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
संपाचे परिणाम –
जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील सर्वच पेट्रोल पंपांवर मंगळवारी वाहनांची मोठी गर्दी झाली होती. दुचाकी, चारचाकी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी लांबलचक रांगा लागल्या असल्याचे चित्र समोर आले होते. त्यामुळे वाहतूकीला समस्या येत होत्या. ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोल मिळणार नाही, हे लक्षात येताच वाहनचालकांनी लगेच टाकी फुल करण्यासाठी पेट्रोल पंपाकडे मोर्चा वळवला. परिणामी काही पेट्रोल पंपावर इंधन काही तासात आऊट ऑफ स्टॉक झाले होते.
संपावर निघाला तोडगा –
केंद्र सरकारने काल रात्री वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढला असून भारतीय न्याय संहितेतील हिट अँड रन संदर्भातील तरतुदी लगेच लागू न करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, या गेल्या दोन दिवसांपासून देशातील इंधन व जीवनाश्यक वस्तूंच्या ठप्प झालेला पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
काय आहे नवीन कायदा? –
नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यापूर्वी, आयपीसी कलम 304A अंतर्गत आरोपीला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे.