ईसा तडवी, प्रतिनिधी
सातगाव डोंगरी (पाचोरा), 4 मे : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत बैल धुण्यासाठी गेलेल्या तीनपैकी दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे आलेल्या भाच्याचाही समावेश आहे. तर या घटनेत तिसऱ्या एकाला वाचवण्यात यश आले आहे.
काल शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी नजीक असलेल्या नांदगाव तांडा (ता. सोयगाव) येथे ही दुर्दैवी घटना घडली. अकील शकील पठाण (वय १८, रा. नांदगाव तांडा, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि रेहान भिकन शेख (१५, रा. सुरत) अशी मृत मुलांची नावे आहेत.
दरम्यान, यामध्ये मनीषा कैलास बागूल (१८) या आदिवासी समाजाच्या तरुणीने आपला जीव धोक्यात घालून साकिब कलंदर पठाण (१३, रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) मुलाचा जीव वाचवला.
रेहान हा नांदगाव तांडा येथे मामा शकील पठाण याच्याकडे आला होता. तर वाचलेला साकीब हा बहिणीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत नांदगाव तांडा येथे आला आहे. काल शनिवारी दपारी हे तीनही जण बैल धुण्यासाठी नांदगाव तांड तलावाकडे गेले. पाण्याचा अंदाज आल्यामुळे तिघेही पाण्यात बडाले. यामध्ये अकील शकील पठाण आणि रेहान भिकन शेख या दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही पाहा : UPSC Yogesh Patil Success Story : जळगावच्या 26 वर्षांच्या तरुणाचं UPSC परिक्षेत घवघवीत यश