मुंबई, 12 ऑक्टोबर : देशभरात एकीकडे विजयादशमी हा सण साजरा होत असताना मुंबईत शिंदेंची शिवसेना तसेच ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय. दरम्यान, मुंबईतील शिवाजी पार्कवरवरील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेच्या शिवसेनेसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली कारण त्यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदूत्त्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे? –
सर्वप्रथम आपल्याला दसऱ्याच्या शुभेच्छा. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन आपण करतो. प्रत्येकाकडे वेगवेगळी शस्त्रे असतात. कुणाकडे तलवार, कुणाकडे गन पण आमच्याकडे लढवय्या मन आहे. आणि परंपरेप्रमाणे ठाकरे कुटुंबीयांनी जी पूजा केली, त्यात बाकी शस्त्र आहेत, त्यात विशेष करुन शिवसेना प्रमुखांचा कुंचला त्याची आधी पूजा केली नंतर आता मी तुम्हा सर्वांची पूजा करतोय.
ठाकरे पुढे म्हणाले की, ही लढाई साधी सोपी नाही. एकीकडे सर्व बलाढ्य अफझाली सारखी माणसं, केंद्राची सत्ता, यंत्रणा आणि तेव्हा जशा स्वाऱ्या यायच्या, गावं नेस्तनाबूत करायच्या, तशा यांनीही उद्धव ठाकरेंना नेस्तनाबूत ठरवले. पण त्यांना कल्पना नाही, ही फक्त शिवसेना नाही तर ही वाघनखं आहे, जी बाळासाहेबांनी मला दिले आहे.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तुमचं पाठबळ जर नसतं तर मी आज उभाच राहू शकला नसतो. सर्व काही गेल्यावर फक्त तुम्हीच आई जगदंबेसारखे उभे राहिलेत. तुम्ही असल्याने त्यांच्या उरावर बसून मी भगवा फडकवून दाखवेन. इथला प्रत्येक शिवसैनिक आजपासून मशाल बनून या भष्ट्राचारी सरकारला चूळ लावण्याशिवाय राहणार नाही.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा : मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. विजयश्री मुठे यांची विशेष मुलाखत
टाटासाहेबांची आठवण –
उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्योगपती गेल्यावर हळहळ वाटणं दुर्मिळ आहे. पण टाटांसारखे उद्योगपती हे विरळे आहे. त्यांनी आपल्या जेवणातली लज्जत वाढवण्यासाठी मीठ दिलं आणि आताचे उद्योगपती मिठागरं गिळत आहेत म्हणून टाटा गेल्याचं वाईट वाटत आहे आणि मिठागरे गिळणारे जात का नाहीत, अशी चिंता वाटत आहेत.
ते पुढे म्हणाले की, टाटासाहेब घरी आले होते. कुटुंबीयांची भेट घ्यायला. निघताना म्हणाले, उद्धव एक लक्षात ठेव, तुला आणि मला एक खूप मोठी परंपरा लाभली आहे. तुला जसा शिवसेनाप्रमुखांचा वारसा लाभला आहे तसा मला जेआरडी टाटांचा वारसा लाभला आहे आणि जेआरडींनंतर जेव्हा मी काम सांभाळायला सुरुवात केली, त्यांनी माझ्यावर संपूर्ण कारभार सोपवला, मी कामकाजाला सुरुवात केल्यावर बरेच दिवस असे व्हायचे की, मी कोणतेही निर्णय घेताना, आज जेआरडी असते तर काय केलं असतं, त्यामुळे मी निर्णयच घेऊ शकत नव्हतो, यानंतर माझ्या लक्षात आलं, अनेक वर्ष मला जेआरडींना काम करताना पाहिले आहे, माझी शैली पाहिली, माझी पद्धत पाहिली. त्यांचा जेव्हा विश्वास बसला तेव्हा त्यांनी माझ्यावर ही धुरा सोपवली.
तसंच तुझं आहे. जशी माझी निवड जेआरडीनी केली तशी तुझी निवड शिवसेनाप्रमुखांनी केली आहे. त्यांनी तुला पाहिलं आहे. कठीण काळात त्यांनी तु काय करतो, कसा लढतो, निर्णय कसे घेतो, हे पाहिल्यावर जेव्हा त्यांना खात्री पटली, हा माझा वारसा समर्थपणे घेऊ शकतो, तेव्हाच त्यांनी तुझी निवड केली, त्यामुळे तुला जे योग्य वाटेल, तेच तु कर. हेच शिवसेना प्रमुखांनी अभिप्रेत आहे आणि आज मी तेच करत आहे. मी कुठेही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. भाजपला लाथ घातली कारण त्यांचे हिंदुत्व हे गोमूत्रधारी बुरसटलेलं हिंदूत्त्व असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना शिंदे गटावर टीका –
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आज या लोकशाहीच्या युद्धाला सुरुवात करताना मी तुम्हाला जाहीर प्रश्न विचारत आहे, मी घेतलेला हा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे, मी त्यांच्याशी लढतोय हे चूक आहे की बरोबर आहे. जा त्या मिध्यांना सांगा, तुझा विचार हा बाळासाहेबांचा विचार नाही. आज त्यांनी जी जाहिरात केली, हिंदूत्त्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण पण पुढच्या दोन ओळी राहिल्या. हिंदूत्त्व आमचा श्वास, मराठी आमचा प्राण, अदानी आमची जान आणि शेळकींचे श्वान. हे शेपूट हलवणारे, मी कुत्र्यांच्या अपमान करू इच्छित नाही. मी श्वानप्रेमी आहे पण मी लांडगाप्रेमी नाही.
भाजपवर जोरदार टीका –
ठाकरे पुढे म्हणाले की, एक लक्षात घ्या, आजची ही लढाई आपण लढायला जात आहोत, हे महाभारत आहेत, कौरव माजले होते आणि अधर्माच्या बाजूने उभे राहिले होते. पण कौरवांची जी मस्ती होती, तुम्हाला आण्ही सूईच्या अग्रावर मावेल इतकीही जमीन देणार नाही, तीच वृत्ती या भाजपची होती. या देशातील कोणताही पक्ष शिल्लक राहता कामा नये, फक्त भाजप शिल्लक राहिला पाहिजे.
तुम्ही आम्हाला संपवायला निघालात. किती मस्ती कराल. मी परवा बोललो की, हे पाप आमचं आहे. ज्यांना महाराष्ट्रात कुणी विचारत नव्हते तेव्हा यांना खांद्यावर बसून महाराष्ट्र फिरवला आज आमची इच्छा आहे की, भाजपला आम्हाला राजकारणात खांदा द्यायचा आहे. ही वृत्ती संपवावीच लागेल. मी आणि फक्त मीच, दुसरं कुणी नाही, हे नाही चालणार. महाभारत मी यासाठी म्हणतोय की, जशी परिस्थिती झाली होती की, मी कुणाशी लढू, माझेच सर्व आप्तस्वकीय माझ्यासमोर आहेत, ज्यांना मी मोठं केलं, त्यांच्यासमोर मी कसं लढू. म्हणून कृष्णाला गीता सांगावी लागली.
शेवटी आपलं कुणी नसतं. आपल्यासमोर जो उभा राहतो तो आपला शत्रू आणि आपल्यासोबत जो राहतो तो आपला मित्र. शत्रू समोर उभा आहे. त्याच्याकडे पाहू नको. त्याला पहिले तुला ठेचलाच पाहिजे. हीच शिकवण आपल्याला छत्रपती शिवरायांनी दिली.
माझ्या आजोबा प्रबोधनकार जे नेहमी सांगायचे, कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली पण ती आमच्या छत्रपतींनी अंमला आणली. महाराजांच्या अंगावरही आप्तस्वकीयच आले होते. पण महाराजांनी पाहिले नाही, हा कोण आहे. जो स्वराज्यावर चालून येतो, तो माझा शत्रू, त्याचा शिरच्छेद केलाच पाहिजे. तशीच ही लोकं आपल्या अंगावर येत आहे, राजकारणातून त्यांचा शिरच्छेद केलाच पाहिजे.
एवढं मोठं दैवत आपलं, छत्रपती शिवाजी महाराज. भाजप आणि मोदींना वाटत आहे की, हे मतं मिळवणारं मशीन आहे. मशीन नाही, ते आमचं दैवत आहे. ईव्हीएम सारखा आमच्या महाराजांचा वापर करू नका.
आम्ही महाराजांचे पुतळे नुस्ते नाही उभारत त्यांची पूजा करतो. आमचं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. ते आमचे दैवत आहे. जसे आम्ही जय श्रीराम म्हणतो, तसेच आम्ही जय शिवराय म्हणतो. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे. मंदिर केवळ मंत्रोच्चारासाठी नाही तर त्यांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवले जातील. आपलं दैवत आपण नाही पुजायचं तर कुणी पुजायचं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.