मुंबई, 19 एप्रिल : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत भाष्य केलं आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी याला समर्थन देत काही अटी तसेच शर्ती देखील घातल्या आहेत. सर्व मराठी माणसांनी एकत्र यावं, असं आम्हाला देखील वाटतं असे म्हणत भाजप, एसंशिंला सोडा, अशी अटही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातली आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते? –
राज ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना आणि तुमची पुन्हा युती होऊ शकते का? असा प्रश्न महेश मांजरेकरांनी विचारला होता. यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वाद खूप किरकोळ आहे. खरंतर, आमच्या वादापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वावासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लक आहेत. म्हणून एकत्र येणं किंवा एकत्र राहणं, या गोष्टी कठीण नाहीत. दरम्यान, प्रश्न फक्त इच्छेचा आहे. दरम्यान, आमची युती व्हावी, अशी महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने त्यांना (उद्धव ठाकरेंना) जाऊन सांगावं तसे, अशी साद राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना घातली.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे काय म्हणाले? –
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी तयार आहे,मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रसाठी एकत्र येण्याचं आवाहन आहे.. पण एक अट आहे, जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होतो, हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हाच विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो.
मात्र, तेव्हा पाठिंबा द्यायचा.आता विरोध करायचा मग परत तडजोड करायची हे असं नाही चालणार. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला घरी मी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही, हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
माझ्याकडून भांडण नव्हतीच, मी मिटवून टाकली चला असे म्हणत शिंदेंच्या शिवसेना तसेच भाजपसोबत न जाण्याची उद्धव ठाकरेनी अटक घातली. दरम्यान, राज ठाकरेंचा यावर कसा प्रतिसाद मिळतो, यावर युतीबाबतचं भविष्य ठरणार आहे. दादरमध्ये भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते आज बोलत होते.