ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 20 जानेवारी : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असताना पाचोरा शहरातून अपघाताची घटना समोर आली आहे. जळगाव येथून दुचाकीवरून निघालेल्या काका-पुतण्याचा पाचोरा-भडगाव रोडवरील नीर्मल सीड्स कंपनीजवळ आज 20 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ज्ञानेश्वर राठोड (वय 36) व संकेत राठोड (वय 19, दोन्ही रा. चंडिकावाडी ता. चाळीसगाव) अशी मृत काका-पुतण्या यांची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोऱ्यातील नेमकी घटना काय? –
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास भडगावकडून चाळीसगावकडील चंडिकावाडी तांडा या गावाच्या दिशेने जाणाऱ्या त्यांच्या दुचाकीस भडगाव रोडवरील निर्मल सीड्स कंपनीसमोर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. दरम्यान, या धडकेत दुचाकीवरील ज्ञानेश्वर व संकेत या दोन्ही काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केला. दरम्यान, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.
गावावर पसरली शोककळा –
याप्रकरणी प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय दिनेश भदाणे हे करीत आहेत. दरम्यान, काका-पुतण्या जागीच मृत्यू झाल्याने राठोड परिवाराने शोक व्यक्त केला असून या घटनेमुळे चंडिकावाडी तांडा गावावर शोककळा पसरली आहे.