संदिप पाटील/सुनिल माळी, प्रतिनिधी
पारोळा, 11 मार्च : राष्ट्रीय महामार्गावर सबगव्हाण गावाजवळ असलेला टोलनाका आजपासून सुरू होण्यापुर्वीच या टोल नाक्यावर आज पहाटे कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून देतानाच तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान, या घटनेने पारोळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर ते मुंबई दरम्यानच्या महामार्गावर तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका विना क्रमांकाच्या कारमधून आलेल्या अज्ञात टोळक्याने कॅबिनमध्ये पेट्रोल टाकून कॅबिन पेटवून दिली. यानंतर त्यांनी दुसऱ्या कॅबिनसह अन्य भागांची तोडफोड करत पलायन केले.
टोलनाक्याचे मोठे नुकसान –
अवघ्या काही मिनिटांमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे टोल नाक्याचे मोठे नुकसान झाले. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीमध्ये चित्रीत झालेला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवली. सदर घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी टोल नाक्याची पाहणी केली. दरम्यान, याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोलनाक्याविरोधात वाहनधारकांच्या प्रतिक्रिया –
तरसोद ते फागणे दरम्यानच्या मार्गासाठी पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावाजवळ नवीन टोल नाका उभारण्यात आलेला आहे. आज या टोलनाक्याचे उद्घाटन होणार होते. या पार्श्वभूमीवर वाहनधारकांच्या टोल नाक्याविरोधात प्रतिक्रिया उमटल्या. पाळधी ते तरसोद बायपाससह या मार्गावरील अनेक भागांचे काम बाकी असतांना हा टोल नाका सुरू करणे चुकीचे आहे तसेच टोलचे दर हे सर्वसामान्य वाहनधारकांना परवडणारे नसल्याचे वाहनधारकांच्या प्रतिक्रिया आहेत.
हेही वाचा : Breaking : 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार, पारोळा तालुक्यातील पिंपरी येथील खळबळजनक घटना