नवी दिल्ली, 11 जून : नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आले. यामध्ये मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले शिवराजसिंह चौहान यांच्यावर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, त्यांनी आज कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला.
कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांसाठीचे मिशन –
आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल. अन्नदात्याच्या जीवनमानात सुधारणा करण हे मंत्रालयाचे मिशन असले पाहिजे, असे वक्तव्य मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी मंत्रालयाच पदभार स्विकारल्यानंतर केले. यावेळी चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.
रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध –
मंत्री चौहान पुढे म्हणाले की, पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य असलेले प्रत्येक पाऊल उचलेल. गेली 10 वर्षे रालोआ सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वचनबद्ध होते आणि आपले मंत्रालय ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले आहेत.
ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा –
शिवराज सिंह चौहान यांनी पदभार स्विकारल्यानंतर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेत मंत्रालयाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली. त्यांनी शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासासाठी सरकारचा जाहीरनामा सुपूर्द केला असू त्याची पूर्तता करण्यासाठी काम करण्याचे सर्वांना आवाहन केले. यावेळी त्यांनी मंत्रालयातील विविध विभागांनी भेट देत कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला.
हेही वाचा : रेल्वे बोगद्यातील साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक घटना