नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : संपुर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे वेळपत्रक जाहीर केले आहे.
निवडणूक आयोगाने केली घोषणा –
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासह झारखंड या दोन राज्यांची विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्राची निवडणूक ही एकाच टप्प्यात पार पडणार असून महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर या दिवशी मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक
- अर्ज भरण्याची तारीख – 29 ऑक्टोबर
- अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
- मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
- मतमोजणी – 23 नोव्हेंबर
महाराष्ट्राची निवडणूक ऐतिहासिक होणार –
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. सुरूवातीला भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससह तीन दिवसांचे सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी असलेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना शिवसेनेत दोन गट पडले. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेत गुवाहटी गाठले. यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. दरम्यान, भाजपने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले. असे असताना पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप घडला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडले. यापैकी अजित दादा गटाने महायुतीला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
सध्यास्थितीत एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी असा सामना रंगताना बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांनी तिसरी आघाडी उभी केलीय. तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मनोज जरांगे-पाटील यांना सोबत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, आचारसंहितेनंतर भूमिका जाहीर करू असे मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्याला सांगितले होते. असे असताना मनोज जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे हे सर्वांचे लक्ष लागलंय. या संपुर्ण राजकीय परिस्थितीचा विचार केला असता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही ऐतिहासिक मानली जात आहे.