जळगाव, 3 सप्टेंबर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा व महसूल पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवाडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयाने काम करून या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण, राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या नियोजना संदर्भात पूर्वतयारी बैठक काल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, सेवा पंधरवड्या दरम्यान, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत प्रत्येक तालुक्यात कार्यक्रमाचे आयोजन करून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात यावे. तीन टप्प्यात हा कायर्क्रम राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्यात पाणंद रस्ते मोहिम, दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरकुल उपक्रम, तिसऱ्या टप्प्यात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत, एक पेड मां के नाम अतंर्गत महाविद्यालयातील युवकांचा सहभाग नोंदवुन वृक्षारोपण कार्यक्रम, छत्रपती शिवाजी महाराज महा समाधान शिबीराचे आयोजन, रोजगार मेळावा, वैद्यकीय शिबिरे, जातीचे, उत्पन्नाचे, रहिवास प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सामान्य नागरिकापर्यंत लाभ पोहचविण्यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा. या पंधरवाडया निमित्त “खासदार क्रिडा महोत्सवाचे” जिल्हयात आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात क्रिडा विभागाच्या विविध योजनांबद्दल जनजागृती करण्यात यावी. क्रिडा महोत्सवाच्या संदर्भात क्रिडा विभाग व विविध क्रिडा संघटनांनी नियोजन करावे, असेही त्या शेवटी म्हणाल्या. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनीही पंधरवाडा कार्यक्रमासंदर्भात बैठकीत उपयुक्त सूचना मांडल्या.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, प्रास्ताविकात म्हणाले, महसूल व जिल्हा परिषदेच्या माध्यमांतून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी सेवा-पंधरवाडा व महसूल पंधरावाडा दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करुन नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचावावा, असे त्यांनी सांगितले. बैठकीच्या शेवटी राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखीय कार्य करणाऱ्या संस्थांचा व राष्ट्रीय खेळाडूंचा प्रशस्तीपत्र देवुन गौरव करण्यात आला.