जळगाव, 24 जानेवारी : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 22 जानेवारी रोजी झालेल्या रेल्वे दुर्घटनेतील जखमींची काल रात्री उशिराने गोदावरी हॉस्पिटल येथे भेट घेऊन आस्थेने चौकशी केली. त्यांनी जखमींच्या नातेवाईकांना भेटून दिलासा देत, “काळजी करू नका, शासनाकडून सर्व प्रकारची मदत केली जात आहे. जखमी लवकरच बरे होतील,” असे सांगून त्यांच्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
रक्षा खडसेंनी रेल्वे दुर्घटनेतील जखमींची घेतली भेट –
पाचोरा ते माहिजी रेल्वे स्थानकादरम्यानच्या परधाळे स्टेशनजवळ रेल्वे दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालय येथे उपचार करण्यात आले होते. त्यानंतर सर्व नऊ जखमींना गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असल्याचे डॉ. केतकी पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही मंत्री महोदयांना रेल्वे दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्रीमती खडसे यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल दुःख व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
जळगाव रेल्वे अपघात प्रकरण –
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी रेल्वे स्थानकदरम्यान परधाळे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या अफवा पसरल्याने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र, त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडले. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…