मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईच्या यात्रेत टवाळखोर मुलांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह इतर काही मुलींची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मुलींच्या मनाविरुद्ध काही टवाळखोर मुलांनी फोटोही काढले. या धक्कादायक प्रकारानंतर टवाळखोर मुलांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात चारही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंत्री रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलताना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी त्यांनी म्हटले की, दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी घटना घडली, तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नव्हे तर आई म्हणून आली आहे. दरवर्षी मुक्ताईनगरला कोथळीला मुक्ताबाईची यात्रा असते. या यात्रेत साहजिक मुलीही जात असतात. परवा संध्याकाळी मला माझ्या मुलीचा फोन आला आणि यात्रेत जाण्याबाबत विचारले असता मी तिला सांगितले की, घरचा गार्ड त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे दोन-तीन मुले मी तिच्यासोबत पाठवले.
तिथे तिच्यासोबत जी वागणूक झाली, तिच्यासोबत 17-18 वर्षांच्या आतल्या मुली होत्या. त्रिशिकापण आता दोन दिवसांपूर्वी 18 वर्षांची झाली. या सर्व 17-18 वर्षांच्या मुली होत्या. पण तिथे कुणीतरी भोई नावाच्या मुलाने, तिथे पाळण्यात बसायला गेला, यांच्यामागे मागे फिरू लागले. आमच्या गार्डने त्याचा मोबाईल घेतला असता त्याने सर्व शुट केलं. बळजबरीने बाजूच्या पाळण्यात जाऊ बसले. आमच्या लोकांना उतरवून जाऊन बसले. परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं. दुसऱ्या पाळण्यातही त्यांनी तसंच केलं. बसल्यानंतर त्याने सर्वांचे व्हिडिओ काढले.
नंतर माझ्या गार्डला शंका आली. या तरुणाने मोबाईलमध्ये नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं? त्यासाठी गार्डने त्याचा मोबाईल घेतला. तर त्या गार्डसोबत यांनी दादागिरी केली. त्याची कॉलर पकडली आणि 30-40 मुलांची तिथे गर्दी झाली आणि हे फक्त 2-3 लोकं असल्याने काही बोलू शकले नाही आणि त्या मुलीही घाबरून गेल्या. निघताना त्या मुलाने या मुलींना धक्काबुक्की केली.
आज सकाळी मी आली. काल त्रिशिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण तीही घाबरलेली होती आणि इथे नसल्याने ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही. आज सकाळी तिने मला असं सांगितलं की, आम्ही एकादशीला फराळ वाटप करतो. यावेळी 24 तारखेला मी पण घरी नव्हती. मला पालला कार्यक्रम असल्याने मी सकाळी गेलेली होती. त्यादिवशी मी तिला फराळ वाटपसाठी पाठवले होते. त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला. हेच मुले तिथे आजूबाजूला फिरत होते आणि चुकीच्या नजरेने पाहत होते. पण तिने दुर्लक्ष केले आणि या सर्व गोष्टी कुठे ना कुठेतरी कनेक्ट होत आहे.
जर या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर हे किती दुर्दैव म्हणावं. आज या लोकांना माहिती आहे ही माझी मुलगी आहे, म्हणजे मंत्री म्हणून, एक खासदाराच्या मुलीसोबत घडू शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही. ही घटना माहिती पडल्यावर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या. त्यावेळी मलाही वाटलं की, आमचंही कुठे ना कुठे चुकतं की आम्ही या गोष्टींकडे लक्ष देत नाही. त्या मुलीनेही मला सांगितलं की, आम्ही शाळेत जातो तेव्हाही असेच प्रकार त्यांच्यासोबत घडतात. हे एक पाच-सहा मुलांची टोळी आहे.
त्यामुळे या टोळीला कठीण शिक्षा झालीच पाहिजे. आज पोलीस स्टेशनला मी माझे पत्र दिलेले आहे आणि आजच्या आज मी या सर्व लोकांना अरेस्ट करायला लावणार आहे. मुख्यमंत्री महोदयांशीही मी याबाबत बोलली आहे. आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही तर सर्व मुक्ताईनगर तालुक्यात राहणाऱ्या महिला, मुलींचा प्रश्न आहे. कारण कुणी कुठेही फिरू शकतं, आज इतकं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण जर फिरायच्या वेळेस अशा घटना घडत असतील तर अतिशय दुर्दैव आहे. अशा प्रृवत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी केली.