जळगाव, 17 सप्टेंबर : पाचोऱ्यासह अनेक तालुक्यात काल आणि परवा अतिवृष्टी झाली. याठिकाणी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद होती. मात्र, पीक विम्यातील हे निकष काढून टाकल्याने कापूस, तूर, उडीद तसेच मका पिकाचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसला हे विसरू नका. दरम्यान, तुमच्या पवित्र मताची किंमत काय केली तर शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खूपसण्याचे काम सरकारने केले, असा घणाघात माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जळगावात काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चात ते बोलत होते.
नुकसानीच्या पाहणीवरून मंत्री गिरीश महाजन यांना आव्हान –
पाचोरा आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली. यावरून उन्मेश पाटील यांनी मंत्री महाजन यांच्यावर टीका करत त्यांना आव्हान दिले. ते म्हणाले की, नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडे अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांकडे मंत्री जातील आणि पंचानामे करतील अन् खोटे-खोटे आश्वासन देतील. मात्र, आम्हाला नको पंचानामा अन् नकोय खोट्या घोषणा; पीक विमाचे आमच्या हक्काचे कवच राहिले असते तर आम्हाला पैसे घेता आले असते. दरम्यान, जामनरेचे गिरीश महाजन हे जर शेतकरी पुत्र असतील तर त्यांनी अग्रीम रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ टाकावी, असे आव्हान उन्मेश पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना दिले.
View this post on Instagram
पीकविम्यावरून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार टीका –
जळगाव जिल्ह्यात 21 दिवसांचा पावसाचा खंड पडला. त्यावेळी मी खासदार असताना पीक विम्या कंपन्यांशी भांडून सव्वा दोनशे कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळवून दिले. मात्र, यावर्षी निकष बदलेले असताना एकही आमदार विधानसभेच्या सभागृहात बोलायला तयार नाही आणि म्हणून यांना जाब विचारण्यासाठी आज हा आक्रोश मोर्चा काढला असल्याचे माजी खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, निवडणुकीच्या आधी पोखरा, 1 रूपयात पीक विमा, कर्जमाफी, कापसाला भावांतर योजना अशा अनेक योजनांची शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीनंतर विसर पडल्याचीही टीका उन्मेश पाटील यांनी केली.
मंत्र्यांना जाब विचारण्याची शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी –
केळी तसेच कापूस उत्पादक यांच्या पीकविम्यातील निकष बदलवल्याने शेतकरी पुर्णपणे उद्ध्वस्त झालाय. यामुळे आधीच्या 1 रूपयांत असलेल्या पीकविम्यातील निकष पुर्वरत झाले पाहिजे. कॅबीनेट मंत्र्यांनी 6 मजल्यवरील कॅबीनेट बैठकीत आमच्या केळीला तात्काळ बोनस द्या किंवा नाहीतर एमएसपीचे धोरण लागू करावे. तसेच केळीसोबत कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आणि मका ज्वारीचे निकष पुर्वरत करा, अशी मागणी केली पाहिजे. ही मागणी पुर्ण झाली नाही तर मंत्र्यांना जिल्ह्यात पाय ठेऊ देणार नाही, असा हा जाब विचारण्याची तयारी आता शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजे, असेही उन्मेश पाटील म्हणाले.
जळगावात आक्रोश मोर्चा –
जळगावात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज शिवतीर्थ मैदानावरून ते जिल्हाधिकारी कार्यापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी राज्यमंत्री तथा प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांची या आक्रोश मोर्चात प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविकास आघाडीतील राजकीय नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.