चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव, 10 एप्रिल : माजी खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. उन्मेश पाटील यांचे तिकिट का कापले गेले, यासंदर्भात आमदार मंगेश चव्हाण यांनी महायुतीच्या मेळाव्यात भाष्य केले होते. दरम्यान, उन्मेश पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंगेश चव्हाण यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
काय म्हणाले उन्मेश पाटील? –
उन्मेश पाटील पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, आमदार मंगेश चव्हाण यांचे राजकीय वय हे साडेतीन वर्ष असून त्यांचे उत्तर हे ऑक्टोबरला मिळेल म्हणून यावर आज बोलणे उचित नाही. दरम्यान, कत्तल खान्यांना परवानगी देण्यात आल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी उन्मेश पाटील यांच्यावर केला होता. यावर उन्मेश पाटील म्हणाले की, तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष द्या. उद्धव ठाकेर ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सगळ्यांची उत्तरे देऊ.
यासाठीच मशाल हाती घेतली –
मंगेश चव्हाण हे अपघाताने राजकारणात आले आहेत. जिल्ह्यातील लोकांचे अपघात करून लोकांना जबाबदार धरत आहेत. माझा जिल्हा मागे पडतो माझा शेतकरी होरपळतोय म्हणून त्यांनी त्यांच्या जबाबदारीला न्याय द्यावा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने 2024 हे क्रांतीचे वर्ष असून मी मशाल यासाठीच हाती घेतली जर तुम्ही चुकीचे काम कराल, तर तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी दिला.
हेही वाचा : लोकसभा निवडणूक 2024 विशेष : सत्तेला आव्हान देणारा माणूस, उन्मेश पाटील!