चंद्रकांत दुसाने, प्रतिनिधी
चाळीसगाव (जळगाव), 14 मार्च : लोकसभा निवडणुकीसाठी जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, खासदार उन्मेष पाटील यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुकीत तिकिट न मिळाल्याने नाराजी नसल्याचे उन्मेष पाटील यांनी स्पष्ठ केले आहे.
काय म्हणाले उन्मेष पाटील? –
मी आतापर्यंत कधीही सुडाचे राजकारण केले नाही. जीवनात पदे येतात आणि जातात. मात्र, पक्षाच्या विचारांचा धागा म्हणून काम करणे महत्वाचे असून आपण हे काम पुढे देखील करत राहणार आहोत. भारतीय जनता पार्टी एक वैचारिक पार्टी असून माझ्या सारख्या कार्यकर्त्याला काम करायची संधी मिळाली आणि अजून पुढे भरपूर काम करायचे आहे. मागच्या वेळेसदेखील मी पक्षाकडे खासदारकीची उमेदवारी मागितली नव्हती. स्मिता वाघ यांची उमेदवारी काढून मला उमेदवारी देण्यात आली होती, असे उन्मेष पाटील यांनी सांगितले.
भविष्यात भरपूर संधी –
उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, पक्षाने निर्णय घेतला, मी लढलो. आता मी स्मिता वाघ यांच्यासोबत उभा राहणार आहे. उमेदवार कमळ आहे, हे डोळ्यासमोर ठेवून काम करणार असून मी भाग्यवान आहे, माझे वय 45 आहे आणि या वयात मला आमदार-खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पक्षाने घेतलेला निर्णय योग्य असून पुढे भरपूर संधी आहे आणि पुढे अजून भरपूर काम करायचे आहे. ही वेळ रुसायची किंवा फुगायची नाही. राजकारण करत असताना माझा विचार सकारात्मक राहिला आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा : ‘…..तर रावेर मतदारसंघात नणंद-भावजय लढत होणार’, गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?