चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव – जळगाव जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माजी खासदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते उन्मेश पाटील यांची चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना एबी फॉर्म मिळाला आहे. तसेच ते हा फॉर्म घेऊन मुंबईहून रवानाही झाले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून याबाबतची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने तिकीट कापल्यानंतर उन्मेश पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर ते लोकसभा निवडणुक लढवतील अशी शक्यता होती. मात्र, त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली नाही. आता विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना चाळीसगाव मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तिकीट मिळाले आहे.
तर उन्मेश पाटील यांना तिकीट मिळाल्यावर त्यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. दरम्यान, आता उन्मेश पाटील आणि भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण या दोघांमध्ये हा प्रामुख्याने याठिकाणी काट्याची टक्कर होणार आहे. उन्मेष पाटील यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे यांनी त्यांना साथ दिली. तसेच विधानसभेची उमेदवारी देवून एबी फॉर्मदेखील दिला आहे, असे ते म्हणाले.