जळगाव, 19 मे : ऐन उन्हाळ्यात राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपुर्व पाऊस पडतोय. जळगाव जिल्ह्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते आतापर्यंत विविध ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाचे सावट असताना आजपासून 25 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (jalgaon weather update)
राज्यात अवकाळी पावसाचा इशारा –
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात 22 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. तसेच कोकण आणि घाट परिसरात अधिक पाऊस पडू शकतो. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने राज्यात आज 19 मेपासून ते 25 मे पर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय –
यंदाच्या मे महिन्यात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत विविध ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. काही दिवसांपासून कुठे कडक ऊन तर कुठे ढगाळ वातावरण आहे. असे असताना आज जळगाव जिल्ह्यात आज ढगाळ वातावरण राहणार असून वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी –
जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागांत रविवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, या पावसामुळे शेतांमध्ये उभा असलेल्या मका, बाजरी आडवी झाली असून चाऱ्याचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लगीनघाई सुरू असतानाच अवकाळी पावसामुळे लग्नघरातील आयोजकांची धावपळ उडल्याचे पाहायला मिळत आहे.