ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा (जळगाव). 6 मे : जळगावसह नंदुरबार, धुळे, व नाशिक जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस अवकाळी पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशातच पाचोरा शहरासह जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान, पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस हलक्या सरी आणि 30 ते 40 किमी/ता वेगाने झंझावाती वारे होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
अवकाळी पावसाची हजेरी –
जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून कुठे कडक ऊन तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच जोरदार वारा वाहत असताना अचानकपणे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस पाचोरा शहरात तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानकपणे आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.
हवामान विभागाचा अंदाज नेमका काय? –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यासह राज्यात पुढील 48 तासांत सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीट होणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक परिसरात पुढील चार ते पाच तास सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
- उघड्यावर वीज चमकत असताना थांबू नका.
- झंझावातात झाडांखाली थांबणे टाळा.
- प्रवास करत असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा.
- मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित करा.