जळगाव, 14 मे : अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले असताना राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडला असून पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचं सावट आहे. या पार्श्वभूमीव मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवसात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता –
राज्यातील अनेक भागात गडगडाटासह पाऊस पडला असून मुंबईसह राज्यातील काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विविध भागात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.
मान्सून अंदामान निकोबारमध्ये दाखल –
नैऋत्य मोसमी पावसाचा अंदमान-निकोबारमध्ये प्रवेश केला असून या ठिकाणी पुढील 24 तास अतिवृष्टीची शक्यता आहे. यानंतर येत्या 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 6 जून रोजी मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे यंदा वेळेआधी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय?-
जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे.