जळगाव, 21 मे : ऐन उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाचे सावट असताना वातावरण गारवा निर्माण झालाय. अशातच पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गेल्या 24 तासात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी शेतीपिकांचे नुकसान होत आहे. तसेच खरीप हंगाामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे खोळंबण्याची चिन्हे आहेत.
राज्यात मान्सूनपुर्व पाऊस –
राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण झाले असून मान्सून पूर्वी पावसाने मंगळवारी महाराष्ट्राला झोडपलंय. पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात वादळी पावसाने दाणादाण उडवली. आजही राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्यानं ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यासोबतच उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय.
जळगाव जिल्ह्यात अवकाळीमुळे नुकसान –
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे जळगाव जिल्ह्यातील विविध भागात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असे असताना जळगावसह पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल तसेच चोपडा आदी भागात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे केळी बागांचे देखील नुकसान झाले तर काही ठिकाणी वीजप्रवाह खंडित झाल्याचे दिसून आले. दरम्यान, ऐन खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती कामांना वेग देणे गरजेचे असताना अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
जळगाव जिल्ह्याचा आजचा हवामान अंदाज –
गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काल रात्री पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही पाहा : Video : संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांची विशेष मुलाखत