यावल, 10 ऑगस्ट : सोळाव्या शतकातील गोंडवाना (गडामंडला) साम्राज्याची पराक्रमी व कर्तृत्ववान राणी दुर्गावती यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने रक्षाबंधनाच्या पावन पर्वावर विरांगणा राणी दुर्गावती महिला सबळीकरण व सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रकल्प कार्यालय, यावल येथे करण्यात आले.
या मेळाव्यास दोन ते तीन हजार आदिवासी महिला उपस्थित होत्या. राज्यातील आदिवासी महिलांना शिक्षण, आरोग्य, प्रशासन, समाजकारण, अर्थकारण आदी सर्व क्षेत्रात सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राणी दुर्गावती आदिवासी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेत वैयक्तिक लाभासाठी 50 हजार रुपये आणि सामूहिक योजनेसाठी 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंत 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यापुढे आर्थिक सहभाग भरण्याची गरज राहणार नाही.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांमार्फत आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत निवड झालेल्या महिलांना लाभांचे वाटप करण्यात आले. आदिवासी कलागुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी पारंपरिक व बोलीभाषेतील सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रकल्प कार्यालय, यावल येथे झालेल्या स्थानिक कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अमोल जावळे, धनंजय चौधरी, प्रांताधिकारी बबन काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, मध्यप्रदेशातील महामानव क्रांतीकारक तंट्या भील यांचे वंशज, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
सामाजिक संस्थांच्या मिरवणुका, जीवंत व चित्ररुपी देखावे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. पंचक्रोशीतील सात ते आठ हजार आदिवासी बांधव व भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र राठोड यांनी केले तर आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.